Coronavirus : अंत्यसंस्कार करणाऱ्या पिता-पुत्राचाच कोरोनाने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

कामगार शक्ती संघटनेची ५० लाखांची मदत देण्याची मागणी 

औरंगाबाद : कोरोनाची लागण झाल्यामुळे स्मशानजोगी असलेल्या पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या कुटुंबाला प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी केली आहे. 

कोरोनाची साथ रोखण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहेत. यातील ११ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात श्री. खरात यांनी सांगितले, की कैलाशनगर स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय स्मशानजोगीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सहा जूनला त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांचा दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला. त्यांचाच ३५ वर्षीय मोठा मुलगा रवींद्र कॉलनी स्मशानभूमीत स्मशानजोगी म्हणून जय बजरंग एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून काम करत होता. त्यालाही कोरोनाची लागण झाली.

सुशांतसिंह राजपूत होता तीन दिवस औरंगाबादेत 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान १२ जूनला त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने शासन निर्णयानुसार प्रत्येकी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे करण्यात आली असल्याचे खरात यांनी सांगितले. मनीषा पाटील, राजेंद्र नवगिरे, भास्कर आढावे, भाऊसाहेब पठारे, पंडित दाभाडे, मो. गयसोद्दीन, श्याम शिरसाट, रमेश शेंडगे, सुरेश बोर्डे, राजू खरात, मोहन सौदे, दीपक पडूळ उपस्थित होते. 

 

 

चोवीस तासांतील अपडेट 
  
घाटी रुग्णालय 

  • १५ जून ते १६ जून सायंकाळी चारपर्यंत ७१ रुग्णांची तपासणी 
  • ३५ रुग्णांच्या लाळेची चाचणी घेण्यात आली 
  • १२ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह 
  • ७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह. १६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा. 
  • घाटीत एकूण २३० रुग्णांवर उपचार. 
  • यातील एकूण १७५ कोविड पॉझिटिव्ह रुग्ण. 
  • ११० गंभीर रुग्ण, तर सामान्य स्थितीत ६५ रुग्ण. 
  • ३९ रुग्ण कोविड निगेटिव्ह, १६ संशयित रुग्ण. 

 
‘घाटी’तून सात जणांना आज सुटी 
पाणचक्की येथील ३२ वर्षीय, रहेमानियाँ कॉलनी येथील ४४ वर्षीय, संजयनगर येथील ५१ वर्षीय महिलांना व  जयभीमनगर येथील ५० वर्षीय, पुंडलिकनगर येथील ४० वर्षीय, सिडको एन-६ येथील ४० वर्षीय व हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुषाला आज सुटी देण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father and son die from COVID-19