Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबादेत फिल्मी स्टाईलने खून, मारेकऱ्याच्या हातात साप

औरंगाबाद : एका तरुणावर टवाळखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही गंभीर घटना संग्रामनगर उड्डाणपूल येथील म्हाडा कॉलनीतील मैदानावर सोमवारी (ता. १६) रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडली. मोबाईल देण्यास नकार दिल्याने खून करण्यात आल्याचे समोर येत आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अक्षय प्रधान (२२, रा. परभणी) असे मृताचे नाव असून, तो औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आई व बहिणीसह राहत होता. अक्षय हा एकुलता एक असून, त्याला वडील नाहीत. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने अक्षय एका मित्राला भेटण्यासाठी दुचाकीने संग्रामनगर उड्डाणपुलाजवळच्या म्हाडा कॉलनीत आला होता. रात्री पावणेनऊच्या सुमारास दोघेजण बोलत होते. बोलत असताना दोघेजण जवळच्या रिकाम्या मैदानाजवळ गेले. त्या ठिकाणी काही वेळातच एका मोटारसायलवर दोघेजण आले.

मोटारसायकलवरील एकाने अक्षय प्रधान याला ‘तुझा मोबाईल दाखव’ म्हणत त्याच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. अक्षयने मोबाईल देण्यास नकार दिल्यावर तिथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघांनी अक्षयच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अक्षय रक्तबंबाळ झाला. नंतर मारेकरी फरारी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय जिवाच्या आकांताने पळत सुटला. म्हाडा कॉलनीच्या मैदानापासून साठ ते ऐंशी फूट आल्यानंतर कॉलनीतील एका रस्त्यावर तो धाडकन पडला.

हे पाहून कॉलनीतील नागरिक धास्तावले. त्यांनी याच परिसरात राहणाऱ्या श्रीमंत गोर्डे पाटील यांना संपर्क केला. घटनेची माहिती दिली. त्यानंतर गोर्डे पाटील यांनी जवाहरनगर ठाणे पोलिसांना खुनासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला तसेच निपचित पडलेल्या अक्षयला रुग्णालयात हलवले; मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रांनी माहिती दिली की, संशयित दोन मारेकऱ्यांचा याच भागातील एका पानटपरीवर नेहमी वावर होता. 

मारेकरी तिशीतले, सीसीटीव्हीत कैद

संशयित मारेकऱ्यांचे वय पंचवीस ते तीस वर्षे असून, त्यांना नशा करण्याची सवय आहे. नशापानातूनच हा खून झाला असावा, अशी शक्यता समोर येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ व आजूबाजूचे फुटेज तपासले. त्यामधून संशयित मारेकरी फुटेजमध्ये दिसून आले आहेत. त्यांची ये-जा आणि थांबल्याचेही फुटेजमध्ये दिसते.

मारेकऱ्यांचा कसून शोध

पोलिसांनी संशयितांची माहिती घेतली असता दोनपैकी एक मारेकरी साप पकडत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले. या दोन्ही संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, घटनेच्या वेळी एका आरोपीच्या हातात साप असल्याचेही समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com