जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा वाजला बिगूल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

प्रारुप मतदार यादी, हरकती असे सर्व सोपस्कार करुन २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर ४५ दिवसात निवडणूक कार्यक्रम पूर्ण केला जाईल, अशी माहिती प्रभारी सहनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी गुरुवारी (ता.३१) दिली.

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात बँकेची निवडणूक होत नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश सहकार खात्याच्या सहनिबंधकांना दिले आहेत. त्यानुसार प्रारुप मतदार यादी, हरकती असे सर्व सोपस्कार करुन २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर ४५ दिवसात निवडणूक कार्यक्रम पूर्ण केला जाईल, अशी माहिती प्रभारी सहनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी गुरुवारी (ता.३१) दिली.
 
औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व सहकार क्षेत्राच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. दरम्यान एका सहकारी संस्थेने जिल्हा बँकेची निवडणूक घेण्या संदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने राज्य सहकारी प्राधिकरणाला या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्राधिकरणाने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 

हे ही वाचा : नैराश्‍य झटकू, आरोग्य राखू अन् व्यवसाय सुरु करणार; तरुणाईचे नव्या वर्षात नवे संकल्प

श्री. दाबशेडे म्हणाले, की मतदार यादी तयार करण्याचे आदेश आले असून, त्यानुसार मतदार यादीचे काम केले जाणार आहे. चार जानेवारीला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होईल. यावर हरकती, आक्षेप दाखल करण्यासाठी ४ ते १३ जानेवारी असा नऊ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त हरकती, आक्षेपावर निर्णय घेऊन जिल्हा बँकेसाठी अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

हे ही वाचा : प्रशासकांच्या ठरावांना पालकमंत्र्यांकडून स्थगिती ; शाळा, मैदाने खासगी संस्थांना देण्यास विरोध 
 
दरम्यान अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात निवडणूक जाहीर करुन निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करावा लागतो, असा नियम आहे. त्यानुसार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम तयार करुन प्राधिकरणाची मान्यता घेणार असून, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. २३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याने फेब्रुवारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the final voter list for the Aurangabad District Central Co operative Bank elections will be announced on January 23 the election program is likely to be announced in February