ऑक्सिजन प्लांटच्या फाईलची धूळ अखेर झटकली, आस्तिककुमार पांडेय यांनी घेतली दखल

माधव इतबारे
Friday, 18 December 2020

चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटची फाईल धूळखात पडून असल्याने काम रखडले असल्याचे समोर आले होते.

औरंगाबाद : चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटची फाईल धूळखात पडून असल्याने काम रखडले असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (ता.१८) दखल घेत अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यानंतर फाईलवरील धूळ झटकण्यात आली. करोना बाधितांना अनेकवेळा ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे मेल्ट्रॉन येथे स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचा निर्णय महापालिकेने पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार घेतला होता.

 

 

यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वाचार कोटींची तरतूद केली व पत्र महापालिकेला पाठवले. ऑक्सिजन प्लांटची निविदा अंतिम झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देणे बाकी होते. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने फाईल मंजुरीसाठी पाठवली. मात्र ही फाईल सहीच्या प्रतीक्षेत पडून राहिली. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ती फाईल इतके दिवस पडून असल्याचे समोर आले. त्यानंतर फाईल अतिरिक्त आयुक्तांच्या दालनातून प्रशासकांच्या दालनाच्या दिशेने निघाली. आता आठवडाभरात ऑक्सिजन प्लांटचे काम सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Astik Pandey Take Oxygen Plant File Aurangabad News