महत्त्वाची बातमी...अखेर बोर्डाने चूक मान्य केली

संदीप लांडगे
शुक्रवार, 20 मार्च 2020

दहावीच्या परीक्षेत बुधवारी घेण्यात आलेल्या विज्ञान भाग दोनमध्येही मोठ्या प्रमाणात चुका होत्या. यात मंडळाने आपली चूक मान्य करीत विज्ञानाच्या चुकीच्या प्रश्‍नांची विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचे सांगितले आहे. 

औरंगाबाद - यंदा दहावीच्या प्रश्‍नपत्रिकेत चुकाच चुका आढळून येत आहेत. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थीही गोंधळले आहेत. आतापर्यंत इंग्रजी, भूमिती आणि विज्ञान भाग एकच्या प्रश्नांत चुका आढळल्या होत्या. बुधवारी (ता. १८) घेण्यात आलेल्या विज्ञान भाग दोनमध्येही मोठ्या प्रमाणात चुका होत्या. यात मंडळाने आपली चूक मान्य करीत विज्ञानाच्या चुकीच्या प्रश्‍नांची विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचे सांगितले आहे. 

विद्यार्थ्यांचा उडाला होता गोंधळ  
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता. १६) दहावीच्या विज्ञान भाग एकच्या प्रश्‍नपत्रिकेत वारंवारितासंबंधी आलेल्या एक मार्काची चूक झाली होती. त्यानंतर बुधवारी (ता. १८) पुन्हा विज्ञान भाग दोनच्या प्रश्‍नपत्रिकेमध्येही गोंधळ दिसून आला. मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या पेपरमधील भाषांतरात ही चूक झाली असून, इंग्रजी माध्यमाच्या पेपरमध्ये प्रश्न एक-एमधील तीन क्रमांकाचा प्रश्न ‘इनकम्प्लीट’ऐवजी तेथे ‘इन’ ‘कंप्लीट’ असे झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला; तसेच प्रश्न क्रमांक तीनमध्ये सहाव्या प्रश्नात रिकाम्या चौकटीत अंक एक ते सहा टाकणे आवश्यक होते. कारण एका गुणास दोन नावे हे विज्ञानाचे प्रमाण आहे, यात आकृती काढणे अपेक्षित नव्हते. कारण आकृती काढायला वेळ लागतो. पेपरसेटरने पुस्तकातून जशीच्या तशी आकृती टाकल्यामुळे ही चूक झाली होती; तसेच प्रत्येक प्रकरणनिहाय गुण किती असावेत हे बोर्डाने अगोदरच ठरवले असताना प्रश्‍नपत्रिका काढणाऱ्यांनी स्वतःचे नियम बनवून प्रश्‍नपत्रिका काढल्याचे दिसून आले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आता देणार गुण
विज्ञान एकमध्येसुद्धा एका ठिकाणी जागेबाबत अस्पष्टता होती. याबाबत बोर्डाने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे विज्ञान भाग दोनमधील आकृतीच्या प्रश्‍नाला मराठी व इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन गुण व प्रश्‍न क्रमांक एकमधील तीन क्रमांकाला प्रत्येकी एक मार्क देण्याची सूचना दिली आहे; तसेच विज्ञान भाग एकमधील वारंवारितासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नालाही एक गुण दिला जाणार आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चूक बोर्डाची शिक्षा विद्यार्थ्यांना 
बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेत यंदा मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे दिसून येत आहे. बोर्डाच्या नियमाप्रमाणे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या विद्यार्थ्यालाच गुण दिले जातात; मात्र प्रश्‍नच चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेदरम्यान गोंधळ होत आहे. चुकीचा प्रश्‍न विद्यार्थी वेळेअभावी टाळतात. परिणामी, विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात, बोर्डाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळत असल्याची भावना पालकांमध्ये आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, the board acknowledged the mistake