सफारी पार्कची निविदा अखेर निघाली; संरक्षण भिंत, सपाटीकरणावर खर्च होणार ११ कोटी

माधव इतबारे
Thursday, 29 October 2020

मिटमिटा भागात स्मार्ट सिटी योजनेतून विकसीत केल्या जाणाऱ्या सफारी पार्कच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध झाली आहे.

औरंगाबाद : मिटमिटा भागात स्मार्ट सिटी योजनेतून विकसीत केल्या जाणाऱ्या सफारी पार्कच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात संरक्षण भिंत बांधणे, प्रवेशव्दार उभारणे व जागेचे सपाटीकरण केले जाणार असून, त्यावर ११ कोटी १८ लाख २२ हजार ९४२ रुपये खर्च केले जाणार आहेत. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे. मिटमिटा भागात शंभर एकर जागेवर सफारी पार्क सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

तरुणांना नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी, एक हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त

मात्र आर्थिक अडचणीमुळे हे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे वळविण्यात आले. त्यासाठी १४७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामासाठी ११ कोटी १८ लाख २२ हजार ९४२ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ६० हेक्टर जमिनी भोवती संरक्षक भिंत बांधणे, प्रवेशव्दार उभारणे आणि जागेचे सपाटीकरण करणे अशी कामे केली जाणार आहेत. निविदेबद्दल आक्षेप घेण्यासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सहा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता स्मार्ट सिटीच्या कार्यालयात इच्छुक कंत्राटदारांची प्री-बीड बैठक आयोजित करण्यात आली आहे तर २३ नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील. २५ नोव्हेंबरला निविदा उघडल्या जाणार आहेत. निविदा अंतिम झाल्यानंतर कंत्राटदाराला आठ महिन्याचा कालावधी काम करण्यासाठी दिला जाणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Safari Park Tender Come Out Aurangabad News