esakal | पहिल्याच दिवशी गजबजली पर्यटनस्थळे; मकबरा, अजिंठा-वेरूळ लेणींसह सर्वत्र दिसले पर्यटक
sakal

बोलून बातमी शोधा

Maqbara Aurangabad

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून बंद असलेली पर्यटनस्थळे गुरुवारपासून (ता.दहा) सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच पर्यटस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली.

पहिल्याच दिवशी गजबजली पर्यटनस्थळे; मकबरा, अजिंठा-वेरूळ लेणींसह सर्वत्र दिसले पर्यटक

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून बंद असलेली पर्यटनस्थळे गुरुवारपासून (ता.दहा) सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच पर्यटस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली. पर्यटन राजधानीतील सर्वच पर्यटनस्थळी तेराशेहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. कोरोनाची पार्श्‍वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यांचे पालन करीत पर्यटकांनी पर्यटनांचा आनंद लुटला. जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा येथे येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन तिकिट विक्री करण्यात आली.

पर्यटनस्थळे सुरु करण्यासाठी औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंट्स फाऊंडेशनने सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले. कोरोनामुळे पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले होते. पर्यटनावर अवलंबून असलेले गाइड, टुर-ऑपरेटर, हॉटेल व्यवसायिकांनी पहिल्याच दिवशीपासून काम सुरु केले आहेत.
---
सकाळी ९ वाजेपासून शहरातील सर्व पर्यटनस्थळे सुरु झाली. वेरूळ व अजिंठा लेणीस दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहील. दररोज केवळ सकाळी एक हजार तर दुपारी एक हजार अशा दोन हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अजिंठा-वेरूळ लेणीसह बिबी का मकबरा या ठिकाणी पाचशेहून अधिक पर्यटकांनी पहिल्या दिवशी भेटी दिल्या. प्रवेशद्वारावरच ऑनलाईन तिकिट क्यूआर कोडच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतर थर्मल गणच्या माध्यमातून तापमान आणि ऑक्सिमीटरच्या माध्यामातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासूनच आत सोडण्यात आले.

मकबरा येथे दुपारी २ वाजपर्यत दोनशेहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या. मास्क असलेल्यांना प्रवेश देण्यात आला. सर्वांना फिजिकल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नियमावलीचे पालन करताना सर्वजण दिसून आले. अनेक महिन्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्या छोट्या-व्यवसायिकही जोमाने आपला व्यवसाय सुरु केला होता.


पर्यटनबसची फेरी वाढल्या
पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन किंवा क्युआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. वेरूळ-अजिंठा लेणीसाठी जाणारी पर्यटन बसची फेरी वाढविण्यात आल्या होत्या. त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अजिंठा लेणीसाठी क्यूआर कोड स्कॅनिंगची सुविधा
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केवळ ऑनलाईन पद्धतीने पर्यटनकांना पर्यटनस्थळी प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज सर्वच ठिकाणी प्रवेश देण्यात आला. मात्र अजिंठा लेणीच्या ठिकाणी इंटरनेटला अडथळा निर्माण झाला. यामुळे केवळ ६० जणांनाच प्रवेश मिळाला. हा अडथळा दूर करण्यासाठी केंद्रीय पुरात्त्व विभागातर्फे फर्दापूर बसस्थानकावर क्यूआर कोड स्कॅनिंगचे सुविधा देण्यात येणार असल्याचे पुरात्त्व विभागाचे अधीक्षक मिलन चौले यांनी सांगितले.


पर्यटनस्थळे--------- भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या
बिबी का मकबरा-------५००
अजिंठा लेणी---------- ६०
दौलताबाद किल्ला----- २५०
वेरूळ लेणी------------३००
औरंगाबाद लेणी--------२००
पानचक्की------------- ५०


 
आजपासून सर्व नियमांचे पालन करीत पर्यटनस्थळे सुरु करण्यात आली.पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी इंटरनेटमुळे अडचण आली. मात्र ती सोडविण्यात आली आहे. अजिंठ्यात फर्दापूराल क्यूआर कोड सोडविण्यासाठीचे सुविधा देण्यात आली आहे. याच पर्यटकांनी लाभ घ्यावा.
- मिलन चौले, अधीक्षक, केंद्रीय पुरातत्त्व विभाग

राज्य सरकारने पर्यटनस्थळे सुरु करण्यास दिलेली परवानगीमूळे छोट्या व्यावसायिकांची घरची चूल पेटली आहे. घरात असलेला पर्यटकाने बाहेर येत पर्यटनवारी केली आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
- जसवंतसिंह राजपूत, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हल्पमेंटस फाऊंडेशन

संपादन - गणेश पिटेकर