जीवाशी खेळ...आधी पॉझिटिव्ह, मग निगेटिव्ह अन् पुन्हा घडले भलतेच 

माधव इतबारे
Thursday, 23 July 2020

आधी पॉझिटिव्ह सांगितले, आता निगेटिव्हचा मॅसेज आला, आम्हांला पॉझिटिव्ह पेशंटसोबत का ठेवले, असा जाब डॉक्टरांना विचारण्यात आला. काही काळ हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला.

औरंगाबाद ः अॅन्टीजेन चाचण्यांसंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम असून, कुठलाही त्रास नसताना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे आक्षेप वारंवार घेतले जात आहेत. दरम्यान, सातारा, चिकलठाणा परिसरातील काही व्यापाऱ्यांना तपासणीनंतर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये भरतीही करण्यात आले. नंतर मात्र मोबाईलवर एसएमएस निगेटिव्ह असल्याचा देण्यात आल्या. त्यामुळे संबंधितांनी सेंटरमध्येच गोंधळ घालत तेथील डॉक्टरांना जाब विचारला. या गोंधळानंतर पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज देण्यात आला. 

अॅन्टीजेन चाचणीत काही ठिकाणी प्रत्यक्षात व मेसेजमध्ये तफावत आढळून येत आहे. सातारा परिसरातील तक्षशिलानगर येथील हायकोर्ट कॉलनीतील नागरिक व विक्रेत्यांची २० जुलैला अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी आठ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तोंडी सांगण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांची टेस्ट करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. ज्या आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते त्यातील सहा जणांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तर दोघांना एमआयटी कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तथापि, बुधवारी (ता. २२) त्यांना मोबाईलवर तुम्ही निगेटिव्ह असल्याचा मॅसेज प्राप्त झाला. त्यामुळे धक्का बसलेल्या नागरिकांनी कोविड केअर सेंटरमध्ये गोंधळ घातला. आधी पॉझिटिव्ह सांगितले, आता निगेटिव्हचा मॅसेज आला, आम्हांला पॉझिटिव्ह पेशंटसोबत का ठेवले, असा जाब डॉक्टरांना विचारण्यात आला. काही काळ हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, त्यांना पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज आला. मग तर आणखीनच गोंधळ उडाला. 
 
एकाच मोबाइल नंबरमुळे गडबड 
प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, चाचणीच्या वेळी काही कुटुंबीयांकडून एकच मोबाइल नंबर दिला जात आहे. त्यामुळे असा प्रकार घडत आहेत. मात्र, पॉझिटिव्ह आलेल्यांना परत मॅसेज पाठविला जात आहे. 
 
माजी नगरसेवकाने घातला गोंधळ 
एका माजी नगरसेवकानेही आपल्या भागात असा प्रकार घडल्याचे समोर आल्याने याच कोविड केअर सेंटरमध्ये कार्यकर्ते आणून गोंधळ घातला. तेथील कर्मचाऱ्यांनी आम्ही केवळ उपचार करण्यासाठी येथे आहोत. अहवालाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडचे विचारणा करावी, असे सांगितले. त्यानंतर माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते निघून गेले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चौकशी करण्याची मनसेची मागणी 
हा प्रकार नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा आहे. चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मनसेचे सुमित खांबेकर यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First positive, then negative and again positive message