पहिली लस कोरोनायोद्ध्यांना, औरंगाबाद महापालिकेने मागविली खासगी रुग्णालयांकडून माहिती

माधव इतबारे
Wednesday, 28 October 2020

पहिल्या टप्प्‍यात कोरोनायोद्ध्यांना म्हणजेच कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

औरंगाबाद : कोरोनावरील लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याने शासनाकडून लसीकरणासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शासनाने महापालिकेकडून लसीकरणासंदर्भातील आराखडा मागविला होता. मात्र, पहिल्या टप्प्‍यात कोरोनायोद्ध्यांना म्हणजेच कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांकडून डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांची (हेल्थ केअर वर्कर्स) माहिती मागवली आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. जोपर्यंत लसीकरण होणार नाही तोपर्यंत कोरोना संपणार नाही, असे सांगितले जात आहे. अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच लस उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार केंद्राने राज्यांना लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. म्हणून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कृती आराखडा मागविला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने लसीकरणासंदर्भातील आराखडा शासनाला पाठविला.

असे असतानाच लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांवर उपचा‍र करणाऱ्या व संबंधित सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जाणार आहे. त्यानुसार महापालिकेकडून वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी खासगी रुग्णालये, दवाखाने, नर्सिंग होम या आस्थापनांना पत्र पाठवून माहिती मागवली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनलाही हे पत्र पाठवले आहे. महापालिकेचे कोविड केअर सेंटर्स, आरोग्य केंद्रे यांचीही माहिती पाठविली जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

२९ ऑक्टोबरची मुदत
शहरातील त्या-त्या भागात आरोग्य केंद्रात माहिती सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी २९ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Vaccine Doses Wiil Give To Corona Warriors Aurangabad News