
रायगड किल्ला, एलिफंटा केव्हज्, आग्र्याचा ताजमहाल पर्यटकांसाठी खुला झालेला असताना सरकार वेरूळ, अजिंठ्याबाबत दुजाभाव का करीत आहे? औरंगाबादसह अन्य पर्यटनस्थळांवर अन्याय होत आहे.
औरंगाबाद : रायगड किल्ला, एलिफंटा केव्हज्, आग्र्याचा ताजमहाल पर्यटकांसाठी खुला झालेला असताना सरकार वेरूळ, अजिंठ्याबाबत दुजाभाव का करीत आहे? औरंगाबादसह अन्य पर्यटनस्थळांवर अन्याय होत आहे. यावर सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार होत असून रोजगाराअभावी अनेकजण हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे उघडावीत, अशी कळकळीची विनंती औरंगाबादेतील पर्यटन व्यवसायातील संघटनांनी सरकारकडे केली आहे.
‘अनलॉक’धोरणानुसार अनेक व्यवहार सुरू झालेले असताना पर्यटन व्यवसाय आठ महिन्यांपासून बंदच आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचाही समावेश आहे. यासंदर्भात टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत म्हणाले, कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाचे सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले आहे. पर्यटनस्थळे तत्काळ खुली करावीत, ही कळकळीची विनंती आहे. सुनील चौधरी म्हणाले, ३० ते ४० टक्के मनुष्यबळ सध्या आमच्याकडे आहे. त्यांनाही पूर्ण पगार देऊ शकत नाही. पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास वर्षानंतर सर्वकाही सुरळीत होऊ शकेल.
आता देवाचा धावा
एलोरा गाइड असोसिएशनचे अमोल बसोले म्हणाले, नऊ महिन्यांत आमची सर्व रसद संपली. आता देवाचा धावा करतो आहोत. सरकारने बाजू स्पष्ट करावी. रोजगाराअभावी आत्महत्या केल्यानंतर सरकार पैसे देते; पण आम्हाला सरकारकडून काहीच नको. केवळ पर्यटन व्यवसाय सुरू करायला मंजुरी द्या.
सरकारचा ऑनलाइन निषेध
सरकारने अनेक क्षेत्र खुली केली असली तरी एकूण अर्थव्यवस्थेत दहा टक्के वाटा असलेला पर्यटन व्यवसाय बंद आहे. हा अन्याय असून याविरोधात औरंगाबादेतील या क्षेत्रातील संघटनांनी आज ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे सरकारचा निषेध केला. यावेळी संबंधितानी काळ्या फिती लावल्या होत्या.
दृष्टिक्षेपात...
- भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी सध्या दररोज एक हजार भाविक येतात. यातील पाचशेपेक्षा जास्त पर्यटक वेरूळला भेट देऊ शकतात.
- चिकलठाणा विमानतळावरून दोन वर्षांपूर्वी १४ विमानांचे उड्डाण व्हायचे. आता केवळ तीनच उड्डाणे.
- हॉटेल्समधील ५० टक्के स्टाफ कमी करावा लागला.
-३० ते ४० टक्के मनुष्यबळावर काम, उर्वरित बेरोजगार.
- हॉटेलिंगमध्ये मनुष्यबळाच्या वेतनाचा प्रश्न.
संपादन - गणेश पिटेकर