औरंगाबादेत दिवसभरात कोरोनाने घेतले चार बळी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

शहरात दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ मे रोजी एकाच दिवशी शंभर जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर ही दिवसभरातील दुसरी उच्चांकी रुग्णसंख्या आहे. शहरातील बाधितांचा आकडा आता ८४३ वर गेला आहे. 

औरंगाबाद - कोरोनामुळे शहरात शुक्रवारी (ता. १५) दिवसभरात चौघांचा बळी गेला. मृतांची संख्या आता पंचवीसवर पोचली आहे. संसर्गाचा विळखा घट्टच होत असल्याचे रोजच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आठ मे रोजी एकाच दिवशी शंभर जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर ही दिवसभरातील दुसरी उच्चांकी रुग्णसंख्या आहे. अठराच दिवसांत ७९० रुग्ण वाढले असून, शहरातील बाधितांचा आकडा आता ८४३ वर गेला आहे. 

असे झाले मृत्यू
हिमायतनगरातील चाळीसवर्षीय पुरुषाला आज सकाळी सहाला ‘घाटी’च्या अपघात विभागातून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होता. उपचार सुरू असताना सकाळी सव्वाअकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी पाचला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत त्यांचा मृतदेह ‘घाटी’च्या शवागृहात ठेवण्यात आला होता. ७४ वर्षीय कोविड पॉझिटिव्ह पुरुषाला (रा. दुर्गामाता मंदिराजवळ, नवीन हनुमाननगर) जिल्हा रुग्णालयातून १५ मे रोजी दुपारी दोनला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. दुपारी पावणेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

इतर आजारही कारणीभूत
बायजीपुरा (गल्ली क्रमांक ३२) येथील ७० वर्षीय पुरुषाला १० मे रोजी दुपारी सव्वादोनला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा ‘कोविड-१९’ अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना त्यांचा दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला. शहानूरमियाँ दर्गा, बीड बायपास भागात राहणाऱ्या ५७ वर्षीय पुरुषाचा सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना ११ मे रोजी ‘घाटी’त दाखल केले होते. १२ मे रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह ठरले. त्यांना मधुमेहाचा त्रास होता; तसेच रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढली होती. कोरोना व अन्य आजारांचे हे चारही बळी होते. 

औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना  

२४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह
‘घाटी’च्या लॅबमध्ये गुरुवारी (ता. १४) घेण्यात आलेल्या एकूण स्वॅब नमुन्यांपैकी २४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, ही सकारात्मक बाब आहे; परंतु दिवसेंदिवस शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. २७ एप्रिल ते १५ मे या काळातच ७८३ रुग्ण वाढले. १५ मार्च ते २६ एप्रिल या काळात शहरात केवळ ५३ रुग्ण होते. या काळात रुग्णवाढीचा दर १.२६ प्रतिदिन होता; पण या अठरा दिवसांतील हा दर ४३.५ एवढा झाला. अर्थात, या काळातील दरदिवशी सरासरी ४३ रुग्ण बाधित होत आहेत. दरम्यान, आतापर्यंत ३०७ रुग्ण बरे झाले आहेत, तर सध्या ५११ जणांवर उपचार सुरू आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

नवीन ठिकाणी आढळले रुग्ण 
कोरोनाने शहरातील अनेक भाग कवेत घेतले आहेत. त्याचा संचार रोज नव्या-नव्या भागात होताना आता दिसत आहे. आज एन- सहा, सिडको, बुढीलेन, सादातनगर, वृंदावन कॉलनी, सिल्कमिल कॉलनी, चाऊस कॉलनी, शिव कॉलनी, गल्ली नं. ५, पुंडलिकनगर, हनुमाननगर, अमर सोसायटी, न्यू हनुमाननगर, गल्ली नं. १, दुर्गामाता मंदिर आदी परिसरात रुग्ण आढळले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four victims of corona in a day in Aurangabad