पेट्रोल-डिझेल चोरणारी टोळीचा पर्दाफाश, पोलिसांनी पाठलाग करुन पकडले तिघांना

Petrol Thieves
Petrol Thieves

 पाचोड (जि.औरंगाबाद)  : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या वाहनांचे इंधन चोरून विकणाऱ्या तीन चोरट्यांना पाचोड ( ता. पैठण) पोलिसांनी पंचवीस किलोमीटर पाठलाग करून पकडल्याची घटना गुरूवारी ( ता.तीन) पहाटे घडली.  चोर व पोलिसांमध्ये तीन तास हा पाठशिवणीचा खेळ रंगला. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना पकडण्यात पोलिसाना यश मिळाले.


यासंबंधी अधिक माहीती अशी, पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड व पोलिस कॉन्स्टेबल जीवन गुढेकर हे गुरुवारी सरकारी पोलिस वाहन घेऊन पहाटे दोन वाजता दरोडा प्रतिबंधक गस्त करीत असताना आडूळहूून पाचोडला परत येताना त्यांना दाभरूळ (ता.पैठण) गावाजवळ एक वाहन संशयास्पद उभी दिसली. पोलिस उपनिरीक्षक श्री खरड व पोलिस कॉन्स्टेबल गुढेकर यांनी आपले वाहन 'त्या' वाहनाकडे  वळविले. पोलिसाचे वाहन आपल्याकडे येत असल्याचे पाहुन 'त्या' वाहनाच्या चालकाने सदरील वाहन आडगाव गावातून आडवळणी रस्त्याने पळवले.

त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. श्री खरड यांनी कडेठाण, रांजणगाव (दांडगा), बालानगर, खादगाव, आंतरवाली (खांडी) येथील ग्रामस्थांना संबंधीत वाहनामधुन काही चोरटे पळुन जात असल्याने त्यास थांबवा म्हणून कळविले. ग्रामस्थाना जागोजागी नाकेबंदी केली. मात्र चोरटे सुसाट वाहन घेऊन पुढे पळत होते, तर पाठीमागे पोलिस त्यांना पकडण्यासाठी जिवाची बाजी लावत होते. परंतु वाहनासमोर पोलिस जीपची धावण्याची क्षमता तोकडी पडत होती. चोरट्यांचे वाहन स्कॉर्पिर्ओ रांजनगाव मार्गे खादगावकडे गेली अन् वेळाने पुन्हा रांजणगाव येथे आली.

तोच ग्रामस्थांना पाहुन संबंधीत चोरट्यांनी वाहन सोडून कापसाच्या पिकांत पळ काढला. तोपर्यंत सकाळचे साडेपाच वाजले होते. सर्वत्र उजाडले होते. समोरील पाठशिवणीचा खेळ पाहुन ग्रामस्थही मदतीला सरसावले. अखेर श्री.खरड, श्री.गुढेकर यांनी कापसाच्या पिकातून एकास तर रांजणगावच्या ग्रामस्थांनी एकास पकडून त्यांच्या स्कॉर्पिर्ओजवळ आणले. मात्र दोघे कापसाच्या पिकांतून पसार झाले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव लखन मदनलालजी भिलाला ( वय ३६) व धर्मेंद्र शिवलाल सोळंकी ( वय २५ , दोघे रा. धुपाडा ता. वडोदिया, जि. शाहजापूर, मध्य प्रदेश) असे सांगितले.

त्यांच्या स्कॉर्पिर्ओची पाहणी केली असता त्यात निळ्या रंगाचे सोळा कॅन होते. त्यापैकी पाच कॅनमध्ये डिझेल भरलेले होते. पोलिसोनी यासंबधी त्यांच्याकडे विचारणा केली असता आपण महामार्गावर धाब्यावर थांबणाऱ्या वाहनाचे इंधन चोरून विक्री करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी 'त्या' दोघांना स्कॉर्पिर्ओसह पोलीस ठाण्यात आणले, तोच रांजणगावच्या ग्रामस्थांनी बलराम सोळंकी (रा. मध्यप्रदेश) या तिसऱ्या संशयीतास पकडून पोलिस ठाण्यात हजर केले. त्याच्या साथीदारांनी त्यास ओळखले. आपण भितीपोटी पळालो असल्याचे सांगून आपला डिझेल, पेट्रोल चोरी हा व्यवसायच बनला असल्याचे सांगितले.


सरकार पक्षाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड यांनी तक्रार दिली असुन चौघांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तिघांस अटक केली. पैठणचे सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी सदरील चोरट्याची करुन चौकशी केली. पुढील चौकशीत अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी पंचवीस तास पाठलाग करून चोरांना जेरबंद केल्याचे पाहुन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी पाचोड पोलीसांचे कौतुक केले. पुढील तपास पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे ,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, सहाय्यक पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक गोरख खरड करीत आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com