esakal | ज्येष्ठांना मोठा दिलासा...आता घरातच मिळणार मोफत वैद्यकीय सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोरोनामुळे आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात उपचार वेळेवर मिळत नसल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसूनच वैद्यकीय सल्ला आणि उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून २५ तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ज्येष्ठांना मोठा दिलासा...आता घरातच मिळणार मोफत वैद्यकीय सल्ला

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - लॉकडाउनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यात वयोवृद्ध नागरिकांची उपचाराविना परवड होत आहे. त्यामुळे रुग्णांना घरी बसूनच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी फिंडॅबिलिटी सायन्सेसने टच बेस सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

टच बेस सॉफ्टवेअरद्वारे उपक्रम
कोरोनामुळे आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात बहुतांश दवाखाने बंद असल्याने किरकोळ आजारांवरही उपचार वेळेवर मिळत नसल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसूनच वैद्यकीय सल्ला आणि उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी फिंडॅबिलिटी सायन्सेस कंपनीने महापालिकेला टच बेस नावाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला रुग्णांना मिळेल. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून २५ तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. दोन-तीन दिवसांतच ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पंचवीस डॉक्टरांची टीम 
रुग्णांवर उपचार व सल्ला देण्यासाठी २५ डॉक्टरांची नोंदणी करण्यात येत आहे. प्राथमिक स्वरूपात मधुमेह, उच्च रक्तदाब यासह किरकोळ स्वरूपाच्या आजारांसाठी नागरिकांना या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधता येऊ शकेल. ही सुविधा ३० जूनपर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन केलेले आहे. ही सेवा मोफत असेल. आयएमएनेही विनाशुल्क सेवा देण्याची तयारी दर्शविलेली असल्याचे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले. कोरोनाच्या भितीमुळे सध्या शहरातील बहुतांश खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे साध्या साध्या आजारावर उपचार घेण्यासाठी जायचे कुठे, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. तुरळक दवाखानेच सुरू असले तरी तेथेही वेळेत उपचार मिळण्याची शाश्वती नाही. याचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
 

go to top