वीजबिलांवर सवलत द्या, अन्यथा आंदोलन छेडु; खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा

शेखलाल शेख
Tuesday, 6 October 2020

लॉकडाऊनमध्ये मार्च पासून सर्व व्यवसाय, उद्योग बंद होते. सहा महिने लोक घरात बसून होते. लोकांकडे पैसा नसतांना दुसरीकडे वीज बिलांचे आकडे धक्का देणारे आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये मार्च पासून सर्व व्यवसाय, उद्योग बंद होते. सहा महिने लोक घरात बसून होते. लोकांकडे पैसा नसतांना दुसरीकडे वीज बिलांचे आकडे धक्का देणारे आहे. हे वीज बिले माफ करावे यासाठी जुलै, ऑगस्ट मध्ये आम्ही निवेदन दिले होते. आता नागरीकांनी फक्त पन्नास टक्केच वीज बिले भरावे. सरकारने ६ नोव्हेंबर एक महिन्यात यावर निर्णय घ्यावा नसता लोकांना सोबत घेऊन आंदोलन छेडु असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवार (ता.६) पत्रकार परिषदेत दिला.

वाचा : छावणी बाजारात वीस म्हशींची विक्री, व्यापारी पैसे न देताच झाला पसार

इम्तियाज जलील म्हणाले की, मार्च महिन्यांपासून आजपर्यंत व्यवहार बंद असल्याने लोक कुठुन पैसे देणार. दुसरीकडे महवितरण कंपनी बिलांवर बिल पाठवत आहे. नागरीकांना लॉकडाऊनच्या काळातील फक्त पन्नास टक्केच वीज बिले भरावी. उर्वरीत बीलांसंदर्भात राज्य शासनाने एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा. राज्य शासनाने निर्णय न घेतल्यानंतर कुणी ही वीज बिले भरु नका असे आवाहन केले जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात वीज बिलापोटी ३०० ते ४०० कोटी रुपये जमा होतात. मराठवाड्याचा विचार केला तर हा आकडा ६०० कोटींच्या पुढे आहे. औरंगाबाद शहरात अडीच लाखांच्या जवळपास ग्राहक आहे. त्यातील दीड लाख घरगुती ग्राहकांचे १०० ते १५० युनिट पर्यंत वीज बिल येते. सरकारने ठरवले तर ते खुप काही माफ करु शकते. विजय माल्या ९ हजार कोटी, ललित मोदी १२५ कोटी, जतिन मेहता ७ हजार कोटी, मेहुल चोक्सी १५ हजार ३५७ कोटी, निरव मोदी २२ हजार कोटी रुपये घेऊन पसार झालेले आहे. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरीकांना बिलांवर बिले पाठविले जात आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी वीज बिले माफ करण्यासाठी मागणी करावी.

हेही वाचा  : इथे तरी विलंब नको! मृत व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल तत्काळ देण्याची गरज

धार्मिक स्थळांचे शंभर टक्के विज बिल माफ करा
लॉकडाऊन मध्ये मंदीर, मशीद, गुरुद्वार, बौद्ध विहार, चर्च अशी सर्वच धार्मिक स्थळे बंद होती. त्यामुळे या स्थळांचे वीज बिले शंभर टक्के माफ करुन त्यांचे युनिट शुन्य करावे. त्यांना कोणत्या ही प्रकारचे वीज बिल आकारु नये अशी मागणी करण्यात आली.

बिहारमध्ये यश मिळेल
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम ने नवीन पक्षासोबत आघाडी केली आहे. किशनगंज मध्ये आम्हाला यश मिळाले होते. आता येथे आघाडी केलेली असल्याने निकाल चांगले येतील असे इम्तियाज जलील म्हणाले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give Electricity Bills Concession During Lockdown, MP Jaleel Demand