महिलेचे १६ तोळे दागिने चोरीला; बहिणीच्या लग्नाला येत असताना बसमध्ये घडला प्रकार

प्रकाश बनकर 
Tuesday, 29 December 2020

पुण्यावरून बहिणीच्या लग्नासाठी औरंगाबादला आलेल्या महिलेच्या बॅगमधून सात लाख ३० हजार ९०० रुपये किमतीचे १६ तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना रविवारी (ता.२७) घडली.

औरंगाबाद : पुण्यावरून बहिणीच्या लग्नासाठी औरंगाबादला आलेल्या महिलेच्या बॅगमधून सात लाख ३० हजार ९०० रुपये किमतीचे १६ तोळ्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना रविवारी (ता.२७) घडली. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून प्रकरण नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

 गायत्री रवींद्र कान्हेकर (३५, रा. इंद्रपुरी कॉलनी, मावळपुणे, तळेगाव दाभाडे) यांची आई एन-७ सिडको भागात राहते. बहिणीचे लग्न असल्याने त्या रविवारी सकाळी पावणे अकरा वाजता पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावरून महाड-जळगाव बसने औरंगाबादला येण्यासाठी निघाल्या. सोबत कपड्यांसह सोन्याचा ऐवज असलेली बॅग होती. दरम्यान, चंदननगरपासून एक २० वर्षे वयाची तरुणी शेजारी येऊन बसली. दुपारी एक वाजता बस एका ढाब्यावर थांबली. तेव्हा सदर तरुणीला लक्ष ठेवण्यास सांगून गायत्री दोन्ही मुलांना वॉशरुमला घेऊन गेल्या. दुपारी दोन वाजता बस नगर मध्यवर्ती स्थानकावर आली. ती तरुणी तेथे उतरली. त्यानंतर दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. अंदाजे तीन वाजता बस घोडेगावला आली. तेथे त्या महिला उतरल्या. सोबत मुले असल्याने गायत्री यांनी बॅग वारंवर तपासली नाही.

मद्याच्या महसुलात 1200 कोटींची घट, आठ महिन्यांत 1837 कोटींचा महसूल

 पावणेपाच वाजता गायत्री या बाबा पेट्रोल पंप चौकात उतरल्या. तेव्हा बॅग तपासली असता कपड्यांच्या बॅगमधील सोन्याचा ऐवज असलेली बॅग गायब असल्याचे लक्षात आले. यात साडेचार तोळ्यांचे मंगळसूत्र, दीड तोळ्यांचा गोफ, साडेचार ग्रॅमचे कानचेन, पाच आणि सात ग्रॅमच्या दोन अंगठ्या, पाच ग्रॅमच्या चार आणि तीन ग्रॅमच्या पाच अंगठ्या, कर्णफुले, दोन तोळ्यांच्या पाटल्या, बाळ्या, नथ, १२ ग्रॅमचे मंगळसूत्र, सोन्याच्या मण्याची पोत, पेंडॉल, डोरले आणि साडेतीन हजार रुपये रोकड असा सात लाख ३० हजार ९०० रुपयांचा ऐवज होता. हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर क्रांती चौक ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी गुन्हा नोंदवून तक्रार नगर पोलिसांकडे वर्ग केली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold jewellery stolen from the woman attending sisters wedding