सत्ता जाताच भाजप रस्त्यावर, या कारणासाठी सरकारला धरणार धारेवर

राजेभाऊ मोगल
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

श्री. बागडे म्हणाले, नागपूर येथे या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र त्याचा लाभ अजूनही झालेला नाही. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनदेखील या राज्य सरकारने पाळले नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होतं. ती मदत पण दिली नाही.

 
औरंगाबाद - जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, सरकारच्या बेफिकिरीमुळे महिलांवरील अत्याचार वाढले. याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२५) भाजपतर्फे राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे ,अशी माहिती श्री. बागडे यांनी दिली. 

याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता.२१) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बागडे म्हणाले, नागपूर येथे या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र त्याचा लाभ अजूनही झालेला नाही. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनदेखील या राज्य सरकारने पाळले नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होतं. ती मदत पण दिली नाही.

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा 

या आणि अन्य मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याविषयी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बांधकाम कामगारांना भाजप सरकारच्या काळात शासनाच्या वतीने देण्यात येणारे सुरक्षा साहित्य सेफ्टी कीट देण्याचं शासनानं बंद केले असल्याचं शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी सांगितलं. यावेळी विजय औताडे, डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे, ज्ञानोबा मुंडे, प्रमोद राठोड, दिलीप थोरात, भाऊ थोरात, राम बुधवंत आदी उपस्थित होते. 
 
आश्‍वासनाचा विसर 
 
सरकार स्थापन करीत असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडी सरकार सरकारच्या प्रमुखांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, असा टोला श्री. बागडे यांनी यावेळी लगावला. 

पाहा -  परीक्षेला सामोरे जाताना...video 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haribhau Bagade News