Breaking: औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

कोरोनाची लागण झाल्यानंतर किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या हर्सूल तुरूंगातील दोन कोरोना बाधित कैदी पळून गेल्याची घटना रविवारी (ता.८) १०: ४६ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे पोलिस आणि प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादः कोरोनाची लागण झाल्यानंतर किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या हर्सूल तुरूंगातील दोन कोरोना बाधित कैदी पळून गेल्याची घटना रविवारी (ता.८) १०: ४६ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे पोलिस आणि प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार 

हर्सूल कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी लघुशंकेला गेल्याचे कळताच या कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवले आणि बेडशीटची दोरी बनवून तिच्या साह्याने खाली उतरत पळ काढला.

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

तेथे तैनात असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात आणून देताच तूरुंग अधिकारी कैलास काळे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मोटारसाकलवर या कैद्यांचा पाठलागही केला. दिल्लीगेट येथे हे दोन्ही कैदी अंधारात लपून बसल्याचे काळे यांना दिसले. त्यांनी या दोन्ही कैद्यांना थांबा असे वारंवार सांगितले. मात्र, ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर आजूबाजूला त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र कैदी आढळून आले नाही, असे काळे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

दोन कैद्यांपैकी एक कैदी आक्रम खान गयास खान हा औरंगाबादच्या जटवाडा येथील असून त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात ३०२, १२० (ब) चा गुन्हा दाखल आहे. दुसरा कैदी सय्यद सैफ सय्यद असद यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ४९८ ( अ) (ब)(क), ४२० चा गुन्हा दाखल आहे. तो औरंगाबादच्याच यासीम मशिदीजवळील नेहरुनगरचा रहिवासी आहे. आज सकाळ पासून पोलिसांनी चौकशी सुरु केली असून ते कुणाकडे जाऊ शकतात, या दृष्टिने शोध कार्य सुरु केले आहे.

हेही वाचा-  मुलीला उलटी आली म्हणून बॅंकमॅनेजरने कार थांबवली अन.... 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harsul Jail CoronaVirus Positive Prisoners Ran Away Aurangabad News