औरंगाबादेतील दांपत्याच्या मदतीसाठी  काँग्रेससह आदित्य ठाकरेही सरसावले 

राजेभाऊ मोगल
Monday, 27 April 2020

लॉकडाउनची अचानक घोषणा झाल्यानंतर राज्यासह देशातील नोकरदार, कामगार, विद्यार्थी, फिरण्यास गेलेले अनेक व्यक्ती त्या - त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यामुळे अनेकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, येथील ज्योतीनगर भागातील शरद पाडवले हे पत्नी शारदा यांच्यासह नैनिताल येथे फिरण्यास गेले आणि अडकले. ते सध्या नैनिताल येथील गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले आहेत.

औरंगाबाद : नैनिताल-उत्तराखंड येथे पर्यटनाला गेलेले ज्योतीनगरमधील सत्तरवर्षीय शरद पाडवले हे पत्नी शारदा यांच्यासह लॉकडाउनमुळे महिनाभरापासून तिथेच अडकले आहेत. त्यांना मधुमेह, रक्तदाब असे आजार असल्याने जास्त काळ थंड हवामानात राहू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला औरंगाबादला घेऊन चला, अशी हाक त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्याकडे फार कुणाचे लक्ष गेले नव्हते. मात्र, ही बाब लक्षात येताच काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी पुढाकार घेतला आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांनी मदतीचा शब्द दिला आहे.

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

लॉकडाउनची अचानक घोषणा झाल्यानंतर राज्यासह देशातील नोकरदार, कामगार, विद्यार्थी, फिरण्यास गेलेले अनेक व्यक्ती त्या - त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यामुळे अनेकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, येथील ज्योतीनगर भागातील शरद पाडवले हे पत्नी शारदा यांच्यासह नैनिताल येथे फिरण्यास गेले आणि अडकले. ते सध्या नैनिताल येथील गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले आहेत.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

मात्र, काही दिवसांतच सुटका होईल, अशी त्यांनी आशा होती. मात्र, लॉकडाउन वाढले आणि जवळचे पैसेही संपले. थंड वातारणात मधुमेह, ब्लडप्रेशर असे आजार असल्यामुळे अधिक त्रास सुरू झाला. त्यामुळे जिवाची घालमेल सुरू झाली. पुणे येथून त्यांची मुलगी मानसी यांनीही सोशल मीडियाद्वारे सरकारकडे मदतीचे आवाहन सुरू केले. मात्र, त्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही.

हेही वाचा : बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग

ही बाब लक्षात येताच डॉ. देहाडे यांनी रविवारी (ता. २६) पर्यटनमंत्री ठाकरे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. श्रीनिवास, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना ट्विट टॅग करीत माझ्या विधानसभा मतदारसंघातील पाडवले यांना मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर लागलीच श्री. तांबे यांनीही पुढाकार घेतला. श्रीनिवास यांनी मदतीची सूत्रे हलवली.

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक

तसेच मंत्री ठाकरे यांनीही मंत्रालयातील मदत कक्षास याबाबत माहिती पाठवत तातडीने मदत करण्यास सांगितले. त्यामुळे आई-वडील लवकरच घरी येतील, अशी आशा मानसी पाडवले यांनी व्यक्त केली आहे. याबद्दल त्यांनी मंत्री श्री. ठाकरे, डॉ. देहाडे, श्री. तांबे, श्रीनिवास यांच्यासह मदतीला धावून येणाऱ्या सर्वांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To help the couple in Aurangabad Thackeray also moved with the Congress