नवऱ्याने टाकले, घरभाडे थकले, चिमुकल्यासह रस्त्यावर अर्धा महिना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

आमदार अंबादास दानवे यांना याच रस्त्यावरून जाताना तिची व्यथा कळाली. त्यांनी त्या भागाच्या नगरसेवकांना तातडीने बोलावून तिच्या घरभाड्याचा प्रश्‍न मिटविला आणि महिनाभराचे रेशनही देऊन तिला घरी पाठवले. 

औरंगाबाद : आधीच पतीने टाकून दिलेले... त्यात कोरोनाच्या महामारीने हातचे धुणीभांडीचे कामही गेले. मग घरभाडे द्यायचे कुठून? घरमालक तर घरभाडे मागेलच, या धास्तीने ती गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून चिंताग्रस्त असायची. 

त्यामुळे तिने रस्त्यावरच्या बसथांब्याचा आसरा घेतला. तब्बल अर्धा महिना ती रस्त्यावरच राहिली. मिळेल त्यावर तिची अन् चिमुकल्याची भूक कशीबशी भागली. आमदार अंबादास दानवे यांना याच रस्त्यावरून जाताना तिची व्यथा कळाली. त्यांनी त्या भागाच्या नगरसेवकांना तातडीने बोलावून तिच्या घरभाड्याचा प्रश्‍न मिटविला आणि महिनाभराचे रेशनही देऊन तिला घरी पाठवले. 

कोरोनाच्या महामारीमुळे मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. यामुळे पहिल्यांदा काम बंद झाले ते धुणीभांडी करणाऱ्या महिलांचे. अशीच भोकरदन तालुक्यातील (जि. जालना) एक महिला चार घरची धुणीभांडी करायची. पती दारूच्या आहारी गेलेला. पदरात दोन लहान मुले. पतीने टाकून दिल्याने ती समतानगरमध्ये किरायाच्या घरात एका लहान मुलासह राहते, तर त्यापेक्षा थोडे मोठे मूल तिने निराधारगृहात ठेवले आहे.

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

लॉकडाउनमुळे दानशूर लोक, सामाजिक संस्थांकडून जीवनावश्‍यक साहित्य दिले जात असले तरी घरभाड्यासाठी पैसे कुठून आणणार? त्यामुळे दोन महिन्यांपासूनचे तिचे घरभाडे थकीत आहे. घरमालक घरभाडे मागेल या धास्तीने ती दहा ते पंधरा दिवसांपासून चिमुकल्यासोबत क्रांती चौकातील एका बसथांब्याच्या आजूबाजूलाच राहत होती. येता-जाता अनेकांच्या नजरेस ती पडत होती. तिथे त्या महिलेला कोणी जेवणाचे पाकीट द्यायचे, त्यावर ती दिवस काढायची. 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
 
यांनी केली मदत
शनिवारी (ता. १६) तिथून जात असताना शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आस्थेने विचारपूस केल्यानंतर तिने आपबिती सांगितली. त्यानंतर त्यांनी समतानगरच्या नगरसेविका रेश्मा कुरैशी यांचे पती अश्‍फाक कुरैशी यांना बोलावून घेतले. त्या महिलेला पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांच्या हस्ते आमदार दानवे यांनी महिनाभराचा किराणा देऊन त्या महिलेच्या घरमालकाची भेट घेण्यास सांगितले. अश्‍फाक कुरैशी यांनीही त्या महिलेला घरभाड्याची काळजी करू नका, असे सांगून धीर दिला आणि तिच्या घरी नेऊन सोडले. घरमालकालाही परिस्थिती सुधारेपर्यंत व कामे सुरू होईपर्यंत घरभाड्यासाठी तगादा लावू नका, अशी विनंती केली आणि रस्त्यावर आलेल्या महिलेला किरायाचा का होईना निवारा पुन्हा मिळाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping hand to Victimized Women at Aurangabad