हर्सूल तलाव अखेर ओव्हरफ्लो...

माधव इतबारे
Wednesday, 5 August 2020

बुधवारी सांडव्याव्दारे तलावाचे पाणी खामनदीच्या पात्रात आले असून, नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे काठावर वसलेल्या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. 

औरंगाबाद ः जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारा हर्सूल तलाव बुधवारी (ता. पाच) अखेर ओव्हरफ्लो झाला. २८ फूट क्षमता असलेल्या तलावात चार दिवसांपूर्वी २६ फुटापर्यंत पाणी आले होते. दरम्यान बुधवारी सांडव्याव्दारे तलावाचे पाणी खामनदीच्या पात्रात आले असून, नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे काठावर वसलेल्या वसाहतींना धोका निर्माण झाला आहे. 

कधीकाळी हर्सूल तलाव शहराची तहाण भागवत होता. मात्र, जायकवाडी धरणातून शहरासाठी पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यानंतर हर्सूल तलावाकडे दुर्लक्ष झाले. असे असले तरी तलावात मुबलक पाणी आल्यानंतर सुमारे १६ वॉर्डांना पाणी पुरवठा केला जातो. काही वर्षांत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे तलाव भरला नव्हता. दरम्यान यंदा १४ वर्षानंतर तलाव भरण्याच्या मार्गावर आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

तलावाची पाणी साठवण्याची क्षमता २८ फुटांची आहे. शनिवारी तलावात २६ फुट पाणी जमा झाले होते. २४ तासात तलाव भरण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण पाऊस गायब झाल्याने तलाव भरण्यासाठी चार दिवस लागले. बुधवारी सकाळपासून तलावाच्या सांडव्याव्दारे पाणी खामनदीपात्रत येण्यास सुरवात झाली. त्यामुळे खाम नदीच्या काठावर असलेल्या बिस्मील्ला कॉलनी, दिलरस कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी, बेगमपुरा, बारापुल्ला गेट या परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने यापूर्वीच या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

सकाळपासून दवंडी 
सांडव्याव्दारे नदीपात्रात पाण्याचा ओघ सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर नागरिकांना स्पीकरद्वारे आवाहन केले. जीवितहानी टाळण्यासाठी घरे सोडून सुरक्षितस्थळी जावे, अशा सूचना सुमारे दीडशे जणांना करण्यात आल्या आहेत. यापूर्वी महापालिकेने नदीपात्रातील सुमारे पाचशे घरांचे अतिक्रमण काढले होते. असे असले तरी ज्यांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावर महापालिका नजर ठेऊन असल्याचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hersul Lake Aurangabad