1cow_4
1cow_4

पशुधन जोपासले तर लोकांची देणी कशी फेडावीत? शेतकरी आर्थिक अडचणीत

पाचोड (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टीने नागवलेला शेतकरीवर्गाने मुलामुलींचे लग्न, खरीप पेरणीला बी-बियाणे, खते, औषधी, घरखर्चासाठी केलेल्या कर्ज, उधार उसनवारीचा वायदेबाजार तोंडावर येऊन ठेपल्याने पत टिकविण्यासाठी दावणीला जोपासलेली जनावरे रविवारी (ता.१५) पाचोड (ता.पैठण) येथील आठवडे बाजारात विक्रीसाठी आणल्याने गुरांचा बाजार दिवाळीच्या तोंडावर फुललेला दिसला.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून निसर्गाच्या लहरीपणावर त्यांची आर्थिक घडी विसंबून असते.

यावर्षी खरिपाची वेळेवर पेर साधली जाऊनही सततच्या पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची वाट लागून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. मात्र हताश न होता त्यांनी रब्बीच्या पेरणीची तयारी केली, परंतु वाफशा अभावीपूर्व मशागती व पेरण्या खोळंबलेल्या आहेत. दिवाळी-दसऱ्याला निघणाऱ्या कापसाच्या भरवशावर काहींनी सावकारांचे उंबरठे झिजवून मुलामुलींचे हात पिवळे केले, तर काही प्रतीक्षेत आहेत. अशातच वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने काळ्याआईची ओटी भरण्यासाठी अनेकांनी पेरणीच्या तोंडावर दावणीची जनावरे विकली.

काहींनी खासगी सावकार, दुकानदारांकडून व्याजी रक्कम घेऊन बी-बियाणे, खते-औषधांची सरबराई केली. त्यांच्याकडून घेतलेल्या रकमा दसरा- दिवाळीला देण्याची रीत आहे. दसरा-दिवाळीला घेतलेली रक्कम परत केली, तर पत टिकून दुसऱ्यावेळी पुन्हा उधार-उसनवारीचे काम होते. या धारणेने आता बहुतांश हातावरचे पशुपालक-शेतकरी पुढे सरसावले गेले. शेतीचे कामे आटोपती होण्याऐवजी यंदा अतिवृष्टीमुळे खोळंबलेले आहेत. पत-प्रतिष्ठा टिकविणे महत्त्वाचे असून बैल,गाई,म्हशी सांभाळून काही फायदा नाही. पशुधन जोपासले तर लोकांची देणी कशी फेडावित या विवंचनेने शेतकरी धास्तावला आहे.

पुढील हंगामासाठी वेळेवर पाहू, तर कुणी पुढील शेतीचा विचार ऐनवेळी करू म्हणून आपली जिवापाड जपलेली गुरे वायदे बाजार तोंडावर असल्याने पाचोडला रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या दावणीला बांधून तो ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभा असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तूर्तास सर्वत्र साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असल्याने ऊसतोड कामगाराशिवाय बैलांना फारसे ग्राहक नाहीत. येथील बाजारात म्हशींव्यतिरिक्त अन्य गुरांना उठाव नसल्याचे दिसते. तूर्तास दिवाळीच्या तोंडावर दुभत्यावर काहींचा सर्वाधिक भर आहे. हिवाळ्यात विविध खुराखासह दुधाची आवश्यकता असल्याने व्यायला आलेल्या गाई-म्हशी खरेदीसाठी पहिलवानाची अधिक पसंती आहे. परंतु बैलांसाठी ऊसतोड कामगाराशिवाय ग्राहक नसल्याने बैलांचे भाव खूपच घसरल्याचे पाहावयास मिळाले.

पावसाने अधिकचा लहरीपणा दाखवल्याने कापसाच्या उत्पादनावर घटीचा परिणाम होऊन अद्याप सावकारासह इतरांची देणी फिटेल एवढा कापूस घरात आलेला नसल्याने गुरे-ढोरे, दुभती जनावरे विकण्यावर भर असल्याचे पाहावयास मिळते. बाजारात दोनशे गाई, शंभरावर म्हशी, पाचशेवर बैल, हजारो शेळ्या विक्रीसाठी आल्या होत्या. म्हशींची किंमत त्यांच्या दुधावर अर्थातच पाच हजार रुपये लिटरप्रमाणे तर गाईंची पाचशे ते सातशे रुपये लिटरप्रमाणे सौदे होताना पाहावयास मिळाले. पूर्वी साठ हजार रुपयास घेतलेली बैलाची जोड या आठवडे तीस ते चाळीस हजारास विक्री होऊन, वीस ते तीस हजारांचा तोटा पूर्वीच्या खरेदीदाराला सोसावा लागल्याचेही पाहावयास मिळाले. कोरोनाच्या संकटात सापडलेला हा मराठवाड्यातील गुरांचा बाजार गत आठ महिन्यांनंतर दुसऱ्यांदा भरला असून कोरोनाला विसरून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी- पशुपालक आपली गुरे बाजारात दावणीला उभे करून ग्राहकाची प्रतीक्षा करीत होते.


दोन बैल विक्रीसाठी आणले होते.सकाळपासून गिऱ्हाईकाच्या प्रतीक्षेत थांबलो असता केवळ तीस हजारांची किंमत लागली.त्यामुळे बैल न विकता परत घेऊन जात आहे.
- सुदर्शन सरोदे, पशुपालक
--
बैलाला उठाव नसून केवळ दुभत्या जनावरास बऱ्यापैकी भाव आहे. पेरणीच्या तोंडावर सत्तर हजारात विकलेली जोड आम्ही आता पस्तीस हजाराला परत मागितली. ती मागताना आम्हालाही लाज वाटते, परंतु बाजारात बैलांस समाधानकारक किंमत नाही.
- दत्तात्रय नेहाले, व्यापारी
--
पेरणीच्या तोंडावर दुकानदाराकडून दिवाळीच्या वायद्यावर बियाणे, खते घेतली. दुकानदार स्वतःस देत नसल्याने दुसऱ्याच्या हवाल्याने ते घ्यावे लागले. आता त्यांचा वायदा आला असून वेळेवर न दिल्यास दुसऱ्यावेळी कोण ओळखेल? म्हणून आज दोन बैलजोड्या चांगली किंमत येईल व ती विकून लोकांची देणी फेडू. मात्र तीस ते पस्तीस हजारांच्या पुढे गिऱ्हाईक मागत नसल्याने फुकटात विकण्याची पाळी आली.
- शेख जाबेर, शेतकरी

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com