रोजगार हमी योजना मंत्री भुमरे यांच्या निवासस्थानापासून धनगर आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलन सुरू

ई सकाळ टीम
Thursday, 22 October 2020

धनगर आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलनाला फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवासस्थानापासून गुरुवारी (ता.२२) सुरूवात झाली आहे.

औरंगाबाद : धनगर आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलनाला फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवासस्थानापासून गुरुवारी (ता.२२) सुरूवात झाली आहे. औरंगाबाद ते जालनापर्यंत हे मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.

फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवास स्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन नाका, जालना येथील घरापर्यंत तब्बल ६० किलोमीटरची धनगर आरक्षण मानवी साखळी तयार केली जाईल. त्यात आरक्षण आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. याच दिवशी राज्याच्या इतर जिल्ह्यातील धनगर समाज अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे जल मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी नुकतेच पार पडलेल्या औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, ऑनलाइन परीक्षा होणार २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान

घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली ‘धनगड’ हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून सिद्ध झाले आहे. परंतू शासनाच्या उदासिनतेमुळे ६५ वर्षांपासून धनगर समाज अधिकारापासून वंचित आहे. श्री.शेवाळे पुढे पत्रकार परिषदेत म्हणाले होते, की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार अशा वल्गना करुन समाजाला धोका दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एक दिवसाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. परंतू, आता त्यांचे सरकार सत्तेवर असल्याने आरक्षणाबाबतचा ठराव तातडीने मंत्रीमंडळात घेऊन तसा अभिप्राय केंद्र सरकारकडे पाठवावा.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human Chain Agitation For Dhangar Reservation In Aurangabad