रस्त्यावर टाकून दिलेल्या नव्वदवर्षीय आजीबाईसाठी माणुसकी आली धावून 

अनिलकुमार जमधडे
Wednesday, 26 August 2020

नातेवाइकांनी फेकले; पण माणुसकीने तारले 
पोलिसांच्या मदतीने मिळाला निवारा 

औरंगाबाद ः कच्ची घाटी परिसरात नातेवाइकांनी फेकून दिलेल्या ९० वर्षीय आजीबाईसाठी माणुसकी धावून आली. माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने मदर टेरेसा आश्रमात आजीबाईला हक्काचा निवारा मिळाला आहे. 
कच्ची घाटी परिसरातील पीरवाडीच्या निर्जन परिसरात सात ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी एका ९० वर्षीय आजीला नातेवाइकांनी रिक्षात आणून टाकून दिले. आशीर्वाद आजी म्हणून या आजीबाईला ओळखले जाते; मात्र काही नागरिकांनी ही माहिती चिकलठाणा पोलिसांना दिली. त्यानंतर बीट अंमलदार अजिनाथ शेकडे व रवींद्र साळवे तसेच माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांनी आजीबाईला घाटी रुग्णालयात रात्री दोन वाजता दाखल केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनाची झाली होती लागण 

तपासण्यांमध्ये आजीबाईची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. परिणामी आजीवर तब्बल १९ दिवस उपचार करण्यात आले. मंगळवारी (ता. २५) आजीबाईची चाचणी निगेटिव्ह आली. ती आता पूर्णपणे बरी झाली आहे. दरम्यानच्या काळात चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांच्या टीमने आजीच्या नातेवाइकांचा शोध घेतला, तेव्हा ती ब्रिजवाडी भागातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. पूर्वी ती भिक्षा मागून खात होती. बहिणीच्या सुनेकडे राहत होती. आता मात्र शारीरिक दुर्बलता आल्याने तिला टाकून देण्यात आले. त्यामुळेच पोलिस नाईक श्री. साळवे यांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मदर टेरेसा आश्रमात निवारा 

आजीबाई बरी झाल्यानंतर तिला घाटी रुग्णालयातून सुटी देण्यात आली; मात्र तिला ठेवणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलिस कर्मचारी अजिनाथ शेकडे, रवींद्र साळवे, सुमित पंडित यांनी मदर टेरेसा आश्रमाशी संपर्क साधला. अखेर आजीबाईला मदर टेरेसा आश्रमात निवारा मिळाला आहे. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी मदर टेरेसा आश्रमातील प्रमुखांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

आजीला फेकून देण्याची ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. जन्मदात्या आई-वडिलांना त्रास देण्याच्या घटना समोर आल्यास थेट गुन्हे दाखल करणार आहे. 
महेश आंधळे (सहायक पोलिस निरीक्षक) 

बेवारस मनोरुग्ण व निराधार देण्यासाठी कोरोना काळात प्रचंड त्रास होत आहे. कोरोनाचे कारण सांगून यंत्रणा जबाबदारी झटकते. काही दिवसांपूर्वी नाशिक हायवेवर सापडलेल्या मतिमंद रुग्णाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र उपचार संपल्यावर त्याचे पुनर्वसन कसे करावे, असा प्रश्न आहे. 
सुमित पंडित (अध्यक्ष माणुसकी समूह) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humanity came running for the ninety-year-old grandmother