विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा साधेपणा पुन्हा दिसला, पत्नीबरोबर खांद्यावर बाजाराची पिशवी घेऊन जातानाचा फोटो चर्चेत

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 16 January 2021

सुनील केंद्रेकर हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात.

औरंगाबाद : औरंगाबाद महसूल विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर आपल्या कामासाठी नेहमी चर्चेत असतात. ते आपल्या शिस्तप्रिय कामासाठी सगळीकडे परिचित आहेत. केंद्रेकर हे त्यांच्या पत्नीबरोबर औरंगाबादेत भाजी बाजारात खरेदी करतानाचा फोटो सध्या चर्चेत आहे. यात कोणताही लवाजमा त्यांच्याबरोबर दिसत नाही. सुनील केंद्रेकर हे आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. भाजी बाजारात त्यांनी पत्नीबरोबर खरेदी केली. हे सर्व क्षण छायाचित्रात कैद करण्यात आले आहे.

ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांनी ही छायाचित्र आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. चौधरी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, की हे फोटो बघा. खादी आणि खाकी यांच्या खूप पुढे जाणारं हे चारित्र्य आहे. समाजाचे खरे हिरो!  हे आहेत औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर- आयएएस. आणि मिसेस केंद्रेकर. औरंगाबादेत भाजी बाजारात खरेदी करतांना. आपल्या कर्तृत्वानं 'खास' बनल्यानंतरही 'आम' राहण्यात खरी कसोटी लागते माणसांची. कोणतंही ढोंग न करता साधेपणा कसा टिकवला जाऊ शकतो याचं हे फोटो उदाहरण आहेत.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

माझ्या पाहण्यात हे फोटो आले तेव्हा राहवलं नाही. फोनवरून त्यांची परवानगी घेतली. पुढच्या पिढीत हा साधेपणाचा आणि सच्चेपणाचा आदर्श झिरपावा म्हणून हा उद्योग. त्यांनी परवानगी दिली, हे सांगत की यात विशेष काही नाही, हे माझं रूटीन आहे. श्रीमती केंद्रेकर यांचा साधेपणाही लक्षणीय. महाराष्ट्र नशीबवान आहे. प्रशासनात आजही असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूसपण सुटलेलं नाही. जे तरूण मित्र एमपीएससी, आयएएस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी हे फोटो कायम स्मरणात ठेवावेत म्हणून पोस्ट करत आहे, असे शेवटी विश्‍वंभर चौधरी आपल्या पोस्टमध्ये सांगतात.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS Sunil Kendrekar Buying Vegetables With His Wife Aurangabad News