हो खरंच! लॉकडाउनमध्येही या कंपनीने दिली भरघोस वेतनवाढ अन् बोनस

प्रकाश बनकर
Monday, 1 June 2020

रविवारी (ता. ३१) भारतीय बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठीचा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे खासगी नोकरदारच नव्हे तर सरकारी नोकरदारांचीही वेतन कपात झाली. आवकच बंद झाल्याने अनेक खासगी कंपन्यांनी आता कर्मचारी कपातही सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. अशी स्थितीत वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने कामगारांना बेसिक पगारात सहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली. आता या कर्मचाऱ्यांना इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ मिळाली आहे. रविवारी (ता. ३१) भारतीय बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठीचा वेतनवाढीचा करार करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

लॉकडाउनमुळे सगळेच उद्योग-धंदे ठप्प आहेत. खासगी क्षेत्राचे तर खूप मोठे नुकसान झाले. लॉकडाउन संपल्यानंतरही अनेक कंपन्या यातून सावरू शकणार नाहीत. त्यासाठी काही वर्ष लागतील, असे जाणकार सांगत आहेत. असे असताना औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या कामगारांना वेतनवाढ दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 

२१ हजार बोनस अजून बरेच काही

पत्रकात म्हटले, वाळूज एमआयडीसीतील मिडास केअर फार्मास्युटिकल्स या संघटनेतील कामगारांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. या करारानुसार कामगारांच्या मूळ मासिक वेतनात सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता कायद्याप्रमाणे असेल व त्याचे प्रमाण इतर मासिक भत्ते मिळून मासिक वेतनात ११ हजार ०३२ रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे. यासह २१ हजार रुपये वार्षिक बोनस देण्यात येणार आहे. एवढे नव्हे तर प्रत्येक कामगारांना ५० हजार रुपये वार्षिक बिनव्याजी उचलही देण्यात येणार आहे. कामगारांसाठी वार्षिक सहलही काढली जाणार आहे, असेही करारात नमूद आहे. 
 
यांनी घेतला पुढाकार
या करारासाठी भारतीय बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष तथा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, सचिव अरुण मते यांनी पाठपुरावा केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक नितीन केतकर, सफराज पटेल, एचआर मॅनेजर अच्युत काळे, डेप्युटी मॅनेजर तुषार वडागळे, कचरू घोडके, सुनील आराक, पद्माकर भालेराव यांची उपस्थिती होती.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increment in pharma company at Waluj