इंडीगोच्या विमानाचे सारथ्य करणार औरंगाबादची "किर्ती' 

photo
photo

औरंगाबाद : गगनभरारी घेण्याची इच्छा पूर्ण करणारी औरंगाबादची किर्ती राऊत ही मोठ्या अभिमानाने देशात आणि विदेशात विमानांची उड्डाणे घेत आहे. औरंगाबादेतून इंडीगो एअरलाईन्सने सुरु केलेल्या पहिल्या विमानाचे सारथ्य किर्ती करणार आहे. बुधवारी (ता. पाच) कंपनीचे पहिले विमान घेऊन किर्ती चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होत आहे. 

मराठवाड्यातील एकमेव वैमानिक 

मराठवाड्यातील पहिली आणि एकमेव महिला वैमानिक म्हणून कॅप्टन किर्ती राऊत हिने मानाचा तुरा रोवला आहे. उद्योजक असलेले सदाशीव राऊत आणि जिजाबाई (रा. एन-9, हडको) यांची मुलगी किर्ती हीची लहानपणापासूनच गगनभरारी घेण्याची अर्थात वैमानिक होण्याची इच्छा होती. सेंट झेव्हीअर्स शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर किर्तीने नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 

एकमेव किर्ती 

स्वत:ची जिद्द आणि आई वडीलांचे प्रोत्साहन असल्यानेच ती बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डेहराडून येथील वैमानिक प्रशिक्षण संस्थेत दाखल झाली. देशभरातील सहा मुलींमध्ये किर्तीची निवड झाली होती. त्यापैकी वैमानिक होण्याचा मान केवळ एकट्याच किर्तीने मिळवला हे विशेष! 

विमानसेवेत दाखल 

किर्ती 2006 मध्ये किंगफिशर एअरलाईन्समध्ये रुजू झाली. सुरवातीला सहवैमानिक असलेली किर्ती कमांडरची अंतर्गत परिक्षा उत्तीर्ण झाल्याने आज ती कमांडर झाली आहे. आतापर्यंत तिला सहा हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. किर्ती 2012 मध्ये इंडीगो एअरलाईन्समध्ये रुजू झाली. सध्या तिचे पुणे मुख्यालय असून, तीने आतापर्यंत दुबई, मलेशिया, अबुधाबी, चेन्नई, कोलकाता, दिल्ली अशा देशविदेशातील विविध शहरांच्या विमानसेवांचे यशस्वी सारथ्य केलेले आहे. 

अवघ्या शहराला अभिमान 

इंडीगो एअरलाईन्सतर्फे नव्यानेच औरंगाबाद-मुंबई ही विमानसेवा सुरु केली आहे. त्यामुळेच पहिल्या विमानाचे सारथ्य करण्याची जबाबदारी कंपनीने किर्तीला दिली आहे. ज्या शहरात ती लहानची मोठी झाली, त्या शहरातील कंपनीचे पहिले विमान घेऊन येण्याची जबाबदारी पार पाडताना सर्व शहरवासीयांसाठी निश्‍चित गौरवास्पद बाब आहे. 

बुधारी होईल आगमन 

बुधवारी (ता. पाच) मुंबई-औरंगाबाद हे पहिले विमान घेऊन किर्ती सायंकाळी 7.30 वाजता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होत आहे. या निमित्ताने शहरवासीयांना तीच्या सत्कार आणि शुभेच्छा देण्याची ही संधी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com