जयंती विशेष : अहल्याबाई होळकरांच्या सवतींचे काय झाले? जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले.

औरंगाबाद : पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची आज (ता. ३१ मे) जयंती. स्वाभिमानी राज्यकर्ती म्हणून त्या जगल्या. या लोकमातेने मालव्याच्या प्रांतावर २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी.  

अहल्याबाईंचे पती खंडेराव होळकर हे सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई यांचे पुत्र. त्यांचा जन्म २ जानेवारी १७२३ ला झाला. अहल्याबाईंशी त्यांचे २१ मार्च १७३८ ला लग्न झाले. त्यावेळी अहल्याबाई आठ वर्षांच्या होत्या. अहल्याबाईंसह खंडेरावांना चार बायका होत्या. खंडेराव यांना कुम्हेर येथे एका लढाईदरम्यान १९ मार्च १७५४ ला वीरमरण आले. त्यांच्या चार बायकांपैकी पुण्यश्लोक अहल्याबाई वगळता इतर तिघी सती गेल्या. पार्वतीबाई पीताबाई आणि सुरताबाई अशी त्यांची नावे आहेत. 

सासऱ्यांनी जाऊ दिले नाही सती

अहल्याबाई याच होळकर घराण्याचे नाव लौकिक करतील. त्या उत्तम प्रशासक आहेत. त्यांना समाजभान आहे, हे त्यांचे सासरे मल्हाररावांनी हेरले होते. त्यामुळेच त्यांनी अहल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. पुढे १२ वर्षांनंतर मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर अहल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. लढाईत त्या स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. राणी अहल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.  

सतत ऑनलाइन असाल तर सावधान! जडताहेत हे आजार...
 

असे गेले बालपण

अहल्याबाईंचा जन्म ३१ मे १७२५ ला पूर्वीच्या बीड, तर आताच्या अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या चौंडी (ता. जामखेड) या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहल्याबाईंचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना मोडी लिपीतून लिहिण्या-वाचण्यास शिकविले होते. त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई होते. माणकोजी शिदे आणि सुशीलाबाई या दांपत्याला महादजी, येसाजी, बाणाजी, विठोजी आणि सुभनजी अशी पाच मुले आणि एक मुलगी होती. ती मुलगी म्हणजे अहल्याबाई. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांचे बालपण लाडात गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information about Ahilyabai Holkar