esakal | लॉकडाउनचे मानगुटी भूत, पुन्हा अफवांना ऊत!
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारातील गर्दी

शहरात सध्या लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ करण्यात येणार असल्याच्या अफवांना ऊत आलेला आहे. सोशल मीडीयावर यावर चर्चाही रंगू लागल्या आहेत. परंतु, असा कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

लॉकडाउनचे मानगुटी भूत, पुन्हा अफवांना ऊत!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. अशातच कोरोनाची रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातच लॉकडाउन वाढणार असल्याच्या अफवांना सोशल मिडीयावर ऊत आला आहे. तथापि, जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाकडून पुन्हा कडक लॉकडाउन करण्यासंदर्भात कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे अधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. 

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा  

विश्‍वास ठेऊ नका 
सध्या लॉकडाउनसंदर्भात जी माहिती पसरविली जात आहे, ती केवळ अफवा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. शहरात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय बाजारपेठेत तोबा गर्दी होत असून रस्त्यांवरही वाहतूक नियंत्रण करण्याची वेळ आली आहे. शेकडो नागरिक काहीही कारण नसताना रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे ‘फिजीकल डिस्टन्स’ पाळले जात नाही. परिणामी रोज नवनवीन वसाहतीत कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचा आकडाही वाढत चाललेला आहे. त्यामुळे शहरवासीयांत लॉकडाउनची चर्चा होत आहे. यातूनच काही लोक लॉकडाउनमध्ये वाढ करण्याच्या अफवांचे पेव सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवत आहेत. हे खरे की खोटे हे विचारण्यासाठीही एकमेकांना संपर्क केला जात आहे; तसेच प्रसिद्धिमाध्यमांच्या कार्यालयात तसेच प्रतिनिधींनाही याविषयी विचारणा केली जात आहे. तथापि, असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच महापालिका प्रशासकांनीही तसे कुठलेही आदेश काढलेले नाहीत. तसे संकेतही नाहीत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

कुठलेही आदेश नाहीत 
लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर लोक मोठ्या संख्येने गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो. हीच भिती सर्वचजण व्यक्त करीत आहेत. तसेच रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाउनची वेळ येऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनीही म्हटले होते. तथापि, राज्य शासनाकडून कुठलेही आदेश नाहीत. तशी चर्चाही अधिकृत स्तरावर झालेली नाही. यापुढील काळात जे आदेश येतील, त्यानुसारच कार्यवाही होईल, असे महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.