जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

चंद्रकांत तारु
Monday, 12 October 2020

मुक्त पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने रविवारी (ता.११) जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडण्यात आले.

पैठण (जि.औरंगाबाद) : मुक्त पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने रविवारी (ता.११) जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. या दरवाजांतून २८ हजार २९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मागील ३१ दिवसांनंतर बंद करण्यात आलेला गोदावरीतील पाण्याचा विसर्ग पाच दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा सुरु झाला आहे.

 

रविवारी सकाळपासुनच आकाशात ढग आले होते. त्यामुळे दिवसभरात ढगाळ वातावरण राहिले. या दरम्यान, मोठा पाऊस सुरु झाला. हा पाऊस सुरु झाल्याने धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातून पावसाचे हे पाणी जायकवाडी धरणात दाखल झाले. त्यामुळे पाणी पातळी वाढ सुरु झाल्यामुळे धरण प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरण सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, तांत्रिक सहायक गणेश खराडकर यांनी धरणाचे प्रथम दर्शनी १८ दरवाजे पाच इंच उचलुन उघडले. यानंतर पुन्हा पाणी पातळीची व मुक्त क्षेत्रात झालेल्या पावसाची नोंद घेवुन सायंकाळी दरवाजाची उंची दीड फुट वाढविण्यात आली. दरम्यान, पाणलोट क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेण्याचे काम धरण प्रशासन सुरु केले असुन त्यानुसार पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धरण नियंत्रण कक्षातील यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून होणार सुरु

गोदावरीचे दुथडी भरुन वाहण्याचे रुप पुन्हा धारण!
जायकवाडी धरणातून यंदाच्या पावसाळ्यात ता.पाच सप्टेंबर रोजी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात दमदार झालेल्या पावसामुळे गोदावरीत पाणी सोडावे लागले. यानंतर हा पाण्याचा विसर्ग वाढत्या पावसाच्या प्रमाणामुळे सतत सुरु ठेवावा लागला. तब्बल ३१ दिवसांच्या पाण्यामुळे या काळात गोदावरी अखंड भरुन वाहिली. त्यामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरुन दुथडी भरुन वाहिले. मागील पाच दिवसांत पात्र रिकामे झाले, परंतु पुन्हा पाणी सुरु झाल्याने गोदावरीने दुथडी भरुन वाहण्याचे रुप धारण केले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayakwadi Dam's Gates Open Aurangabad News