अरेरे!!! समृद्धी महामार्गाची खडी विकली आता बसले खडी फोडत

सुषेन जाधव
Monday, 4 May 2020

समृद्धी महामार्गासाठीची खडी अवैधरीत्या विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

औरंगाबाद: समृद्धी महामार्गासाठीची खडी अवैधरीत्या विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

पोलिसांनी कंपनीतील आणखी तिघांना बुधवारी (ता.२९) रात्री अटक केली. सुरक्षारक्षक गणेश मोटे (२२, वरझड), सुपरवायझर देवकीकुमार यादव (४०, मुंगेर बिहार, ह. मु. करमाड) व चालक सहदेव यादव (२८, रा. गया बिहार, ह. मु. भांबर्डा) अशी संशयितांची नावे असून, त्यांना ३० एप्रिलला पोलिसांनी अटक केली होती. 

हेही वाचा - आमदार विक्रम काळे उच्च न्यायालयातही जिंकले!!! 

प्रकरणात मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि. हैदराबादचे कार्यकारी व्यवस्थापक रमनजुला रेड्डी पी. रंगा रेड्डी (३७, रा. थिम्मन पेटा, जि. अनंतपूर, आं.प्र.) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणारी खडी गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीच्या धरमकाट्याचा ऑपरेटर अनिल काळे हा अज्ञात व्यक्तींना विक्री करीत असल्याची माहिती रेड्डी यांना मिळाली होती. आतापर्यंत त्याने दोन लाख रुपये किमतीची विक्री केल्याचेदेखील समोर आले आहे.

प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अनिल काळे याला गजाआड केले. पोलिस कोठडीदरम्यान वरील तिघा संशयितांच्या साहाय्याने गुन्हा केल्याची कबुली काळे याने दिली. त्यानुसार पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. प्रकरणात सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले. 

क्लिक करा- मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Judicial Custody to Three Accused Aurangabad News