ईमेल हॅक करून लाखोंचा गंडा, वाळूजमधील वर्षा फोर्जिंग कंपनीची फसवणूक

रामराव भराड
Friday, 8 January 2021

वर्षा फोर्जिंग कंपनीचे सहायक व्यवस्थापक ऋषिकेश हमदापूरकर यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाळूज (जि.औरंगाबाद)  : वर्षा फोर्जिंग कंपनीच्या व्यवस्थापकाचा ईमेल हॅक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी (ता. सात) उघडकीस आली. वाळूज औद्योगिक वसाहतीतील वर्षा फोर्जिंग या कंपनीत स्टीलचे उत्पादन केल्या जाते. कंपनीला लागणारे मटेरियल्सची आयात करण्यासाठी कंपनीकडून हैद्राबादच्या केएसटी अस्पात या कंपनीकडे मागणी करण्यात आली होती.

शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

त्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून वर्षा फोर्जिंग कंपनीचे व्यवस्थापक फजल खान यांनी मटेरियल पुरविणाऱ्या कंपनीचे बॅंक डिटेल्स घेऊन ऑनलाइन पद्धतीने कंपनीच्या बँक खात्यावर १२ लाख ४७ हजार ८५० रुपये जमा केले. त्यानंतर वर्षा फोर्जिंग कंपनीच्या खात्यावरून रक्कम कपात झाली होती. दरम्यान, फजल खान यांनी मटेरियल्स पुरविणाऱ्या कंपनीला संपर्क साधला. मात्र, त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्षा फोर्जिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

औरंगाबाद ताज्या बातम्या वाचा

या चौकशीत फजल खान यांचा ईमेल आयडी हॅक करून परस्पर पैसे काढल्याचे समोर आले. यात आरोपीने वर्षा फोर्जिंग कंपनीच्या खात्यातून कपात झालेले १२ लाख ४७ हजार ८५० रुपये हे लखनौ येथील अलाहाबाद बँकेचे खातेदार राजेश्वरसिंग याच्या बँक खात्यावर जमा केल्याचे चौकशीत समोर आले. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच वर्षा फोर्जिंग कंपनीकडून तक्रार केल्यानंतर राजेश्वरसिंग यांचे बँक खाते गोठविण्यात आले. मात्र, तोपर्यंत साडेपाच लाख रुपये विविध खात्यावर ट्रॉन्सफर करून व एटीएमद्वारे काढून घेतली. या प्रकरणी वर्षा फोर्जिंग कंपनीचे सहायक व्यवस्थापक ऋषिकेश हमदापूरकर यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत हे स्वतः करीत आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakh Of Rupees Cheated To Varsh Forging Company Waluj MIDC Aurangabad News