CoronaVirus : गावगाडा ‘लॉक’, बारा बलुतेदार ‘डाऊन’!

अनिलकुमार जमधडे
Monday, 1 June 2020

गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदारांचे बेहाल 

कोट्यवधींचे पॅकेज कोसो दूर,

लॉकडाऊननंतरची परिस्थिती आणखी भयावह

औरंगाबाद : कोरोनाच्या अनुशंगाने दोन महिन्यांत अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या लॉकडाउनच्या काळात गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदारांचेही प्रचंड हाल झाले. या वर्गाकडे सरकारने आणि समाज व्यवस्थेनेही लक्ष दिले नाही. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजपासून हा वर्ग कोसोदुर आहे. त्यामुळेच लॉकडाउननंतरच्या काळात या वर्गावर बिकट परिस्थिती ओढवणार आहे. 

पूर्वी ग्रामीण भागात वस्तु-विनिमय पद्धत होती. या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. शेतकरी धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्‍यास व इतरांना सेवा पुरवीत. यामध्ये जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हटले जात. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्‌पिढ्या तेच ठरावीक काम करीत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

असे आहेत बारा बलुतेदार 

बारा बलुतेदारांमध्ये कुंभार, कोळी, गुरव, चांभार, मातंग, तेली, न्हावी, परीट, माळी, महार, लोहार, सुतार या वर्गांचा समावेश होता. हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमध्येही बारा बलुतेदारांचा अंतर्भाव होता. त्यात आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी-नदाफ, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर, शिकलगार आदी बारा जातींचा समावेश होता. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

चुलीचा खरा प्रश्न

लॉकडाऊननंतर बाजारपेठा हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, दोन महिने रोजी रोटीच बंद झालेल्या गावगाडा हाकणाऱ्या बारा बलुतेदारांच्या घरच्या चुलीचा खरा प्रश्न आहे. बलुतेदारांपैकी शहरात आणि गाव खेड्यातील साळी, माळी, तेली, कुंभार, न्हावी, चांभार, शिंपी, सोनार, भोई, कोळी, रंगारी, धोबी, सुतार, लोहार, गवंडी या पारंपारिक व्यावसायिकांची दैना उडाली आहे. विषेशतः हातावर पोट भरणाऱ्या बलुतेदारांपैकी न्हावी, भोई, शिंपी, चांभार, परीट यांना मोठा फटका बसला आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कंबरडे मोडले 

सलुन व्यावसायीक, टेलरींग कारागीर, परीट, सुतार, लोहार, टोपली, केरसुणी तयार करून गावोगावी विक्री करणारे मातंग बांधव, चप्पल-बुट सांधणारे गटई कामगार, दाळ्या-फुटाणे विकणारा भोई समाज, कोळी, कुंभार, सुवर्ण कारागीर आणि गावोगाव फिरून फुले जमवून हार आणि गुच्छ बनविणारे माळी व गुरव बांधव, फळे विकून उपजिविका करणारे बागवान, गावोगावी- गल्ली बोळात बांगड्या विकणारे मनियार, गाद्या, दुलई तयार करणारे पिंजारी, यंत्रमागावर विणकाम करणारे जुलाहा (साळी) बांधवांचे लॉकडाऊनने अक्षरश: कंबरडेच मोडले आहे. 

 

‘लॉकडाऊन’च्या या दोन महिन्यांत बारा बलुतेदारांपैकी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू झाले असले, तरीही परिस्थिती पूर्वपदावर यायला आणि भांडवलाची जुळवाजुळव करायला बराच वेळ लागेल. या घटकांना पुन्हा मूळ प्रवाहात आणून 'आत्मनिर्भर' करण्यासाठी २० लाख कोटी पॅकेजचा थेट फायदा मिळला पाहीजे. 
-रवींद्रकुमार जाधव, सामाजिक विश्लेषक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock Down Affects Twelve Balutedar's Lives