‘सकाळ’च्या भूमिकेला पाठिंबा : डॉ. देशपांडे म्हणतात, सरसकट लॉकडाऊनचा फेरविचार व्हावा

संकेत कुलकर्णी
Monday, 13 April 2020

ज्या शहरांमध्ये लॉकडाऊन अत्यावश्यक आहे, तिथे ते कठोरपणे राबवावे. परंतु इतर ठिकाणी उद्योग थोड्याबहुत प्रमाणात सुरू करण्याचा विचार जरूर व्हावा. सार्वजनिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, सार्वजनिक ठिकाणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, प्रवास या गोष्टी अजून बंद ठेवल्या, तर काही बिघडणार नाही. परंतु, उद्योग सुरू झाले पाहिजेत.

औरंगाबाद : इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाला अटकाव करण्यात लॉकडाऊन उपयोगी पडले हे खरे आहे. पण आता हे 'सरसकट लॉकडाऊन' कमी करता येईल का, याचा विचार व्हावा, असं मत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. रोगाबद्दल सावधगिरी असावी, पण त्याच्याबद्दल फोबिया डेव्हलप होऊ नये, असंही ते 'सकाळ'च्या भूमिकेला पाठिंबा देताना म्हणाले.

कोरोनाचा फैलाव इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी झाला, याची जी काही कारणं आहेत, त्यात लॉकडाऊन हे एक मोठं कारण आहे. पण आता सरसकट लॉकडाऊन टाळता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ''रोगाविषयी सावधगिरी असावी, पण त्याच्याबद्दल फोबिया डेव्हलप होऊ नये. तसंच आपल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कसाबसा उभा आहे. आता अजून लॉकडाऊन सरसकट असेच चालू राहिले, तर तो सपशेल भुईसपाट होण्याची भीती आहे. दूरगामी शर्यतीत टिकून राहायचे असेल, तर हे आपल्याला परवडणार नाही.''

''ज्या शहरांमध्ये लॉकडाऊन अत्यावश्यक आहे, तिथे ते कठोरपणे राबवावे. परंतु इतर ठिकाणी उद्योग थोड्याबहुत प्रमाणात सुरू करण्याचा विचार जरूर व्हावा. यामुळे लोकांना रोजगार मिळू शकेल. सार्वजनिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, सार्वजनिक ठिकाणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, प्रवास या गोष्टी अजून बंद ठेवल्या, तर काही बिघडणार नाही. परंतु, उद्योग सुरू झाले पाहिजेत. लोकांचा रोजगार सुरू होणे हे साथीच्या रोगाला अटकाव करण्याइतकेच महत्त्वाचे आहे,'' हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

या सगळ्या निर्णयप्रक्रियेत साथरोगाचे तज्ज्ञ आणि व्हायरॉलॉजीचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे, असे आम्ही गृहित धरून चालतो. शासकीय पदांवर असलेल्या व्यक्ती याबाबत तज्ज्ञ असतीलच, असे नाही. त्यामुळे जे या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत, त्यांचा विचार घ्यावा. सर्वंकष विचार होऊन लॉकडाऊनबाबत एक निर्णय व्हावा, असेच आपल्याला वाटत असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Should Be Reviewed By Government Aurangabad News