औरंगाबादच्या सिडको चौकात भीषण अपघात; एक तरुण ठार, बसमधील दहा प्रवासी जखमी

मनोज साखरे
Tuesday, 22 December 2020

औरंगाबादच्या सिडको येथील चौकात स्थानकातून निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने धडक दिल्याने दूचाकीवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.

औरंगाबाद : सिडको येथील चौकात स्थानकातून निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने धडक दिल्याने दूचाकीवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. बसचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने आतमधील दहा प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात मंगळवारी (ता. २२) दूपारी बाराच्या सूमारास घडला. अपघातानंतर मोठी गर्दी होऊन वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. या चौकात हा तिसरा भीषण अपघात असून आतापर्यंत चौघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाला.

 

या अपघातातील मृताचे नाव अद्याप कळु शकले नाही. मात्र त्याच्यासोबत दूचाकी चालविणाऱ्या तरुणाचे नाव शुभम शिंदे असून तो परळी येथील रहिवाशी आहे. अपघातात बसमधील नजीमा ईनामदार (वय ३८),
शिला गंगावणे (वय ३४) यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

असा झाला अपघात
सिडको चौकात लाल सिग्नल लागल्याने समोर एसटी महांडळाची बस (क्रमांक एम. एच. १३, सीयू ७३१२) उभी होती. बसच्या मागे व बाजूला वाहने व शुभमची दूचाकीही (क्रमांक एम.एच. ४४, व्ही. ४४१२) होती. मागून जालनाकडे जाणारी महामंडळाचीच एक बस (एम.एच. २०, बी.एल. २९०६) आली. तीचा वेग जोरात होता; त्यामुळे ती थेट शुभमच्या दूचाकीला धडकली. त्यामुळे दूचाकी समोरील बसवर धडकली. दोन बसच्या मध्ये शुभमची दूचाकी अडकून मागच्या बसच्या समोरील चाकाखाली आली. बसखाली शुभमसोबत असलेला त्याचा मित्र जागीच ठार झाला तर शुभम गंभीर जखमी झाला.

 

अपघाताची मालिका कायमच
सिडको चौकात किरकोळ अपघात होतात; परंतू आतापर्यंत तीन भिषण अपघात चौकातील ‘सिडको’ असे लिहिलेल्या वाहतूक बेटाजवळ झाले आहेत. बेगमपूरा येथील एका बुलेटस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तसेच बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे वाहतूक सिग्नलवर थांबलेल्या दूचाकीस्वारांना बसने चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. आजचा एक मृत्यी असे या ठिकाणी चौघांचा बळी गेला आहे.

अपघातानंतर
-सिडको चौकात अपघातानंतर तासभर मोठी वाहतूक कोंडी
-अपघातानंतर आपत्कालिन रुग्णवाहिका तासभरातही आली नव्हती.
-डिझेल, ऑईलची टाकी फुटली, रस्त्यावर इंधन व रक्त सांडले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Died In Bus Accident, Ten Passengers Injured Aurangabad News