esakal | लम्पीला रोखण्यासाठी गोचिडांचा बंदोबस्त 
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy

रोगाचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड अशा कीटकांपासून होतो. मरतुकीचे प्रमाण एक ते पाच टक्के इतके आहे. 

लम्पीला रोखण्यासाठी गोचिडांचा बंदोबस्त 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : जनावरांमध्ये लम्पी त्वचा साथरोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पशुपालक काळजीत पडले असून, गोचीड, गोमाश्यांपासून लम्पीचे संक्रमण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गोचीड, गोमाशी निर्मूलन कार्यक्रम राबवण्यात आला. लम्पीची लक्षणे दिसल्यास पशुपालकांनी घाबरून न जाता जवळच्या पशुचिकित्सालयात दाखवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले की, लम्पी आजार विषाणूद्वारे होतो. आजाराची सुरवात ऑगस्ट २०१९ मध्ये ओरिसा येथून झाली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यांत प्रसार झाला. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये या रोगाच्या सदृश लक्षणे असलेले जनावरे आढळून आली आहेत. रोगाचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड अशा कीटकांपासून होतो. मरतुकीचे प्रमाण एक ते पाच टक्के इतके आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अशी आहेत लक्षणे 
जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्राव होणे, भूक मंदावणे इत्यादी सुरवातीची लक्षणे दिसतात. नंतर डोके, मान, पाय, पाठ, इत्यादी ठिकाणी दोन ते पाच सेंटिमीटर व्यासाच्या गाठी येतात, त्यातून पू येऊ शकतो. इन्फेक्शन नाकामध्ये गेले तर निमोनिया होऊ शकतो. गाभण जनावरे गाभडतात. जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. आजारावर उपचार नाही; मात्र जखमांमध्ये जिवाणूंचा संसर्ग होऊन दुय्यम आजार होऊ नये, म्हणून प्रतिजैविके पाच ते सात दिवस द्यावी लागतात. पाच ते सात दिवसांच्या योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे करा 
प्रथम आजारी जनावरांना वेगळे करावे व त्याच्या खाद्य, चारापाणी व्यवस्था वेगळी करावी. 
गोठ्यातील कीटकांचा बंदोबस्त करावा. गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा. गोठ्याशेजारी पाणी, शेण, मूत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. 
कीटक मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करावा; तसेच घरच्या घरी कीटकनाशक तयार करावे. दहा लिटर पाण्यात ४० मिलि. करंजी तेल, ४० मिलि. नीम तेल आणि १० ग्रॅम अंगाची साबण चांगली मिसळून घ्यावी, हे द्रावण दिवसातून दोन ते तीन वेळा फवारल्यास आपल्या गोठ्यामध्ये कीटकांचे निर्मूलन होते. 
बाधित जनावरांचे चारापाणी वेगळे करावे. 
बाधित जनावरांपासून १० किलोमीटरच्या परिसरात जनावरांचे बाजार, पशुप्रदर्शने अथवा स्पर्धा बंद करावा.