कोरोनाच्या उच्चाटनासाठी महामारी शमन मंत्राचा जप करा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

सर्वजण दुर्गा सप्तशती, रामरक्षा आणि महामृत्युंजय मंत्राबरोबरच महामारीशमन मंत्राचाही जप करत आहेत. या विशेष मंत्राचा जप केल्याने कोरोनाच्या महामारीचे शमन होईल, अशी श्रद्धा असल्यानेच हे अनुष्ठान सुरू केल्याचे खैरे यांनी कळवले आहे. ​

औरंगाबाद : जगभरात कोरोना व्हायरसच्या महामारीने थैमान घातले आहे. या महामारीविरोधात डॉक्टर, वैज्ञानिक, आरोग्य संघटना लढा देत आहे. या सर्वांना पाठबळ मिळावे, यासाठी आध्यात्मिक लढाई सुरू केल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या पुढाकाराने दौलताबादच्या घाटातील दक्षिणमुखी मारुती मंदिरात दुर्गा सप्तशतीचे १४ पाठ, रामरक्षा आणि महामृत्युंजय मंत्राचे जपानुष्ठानही करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न कृष्णाकांत मुळे गुरुजी यांच्या पौरहित्याखाली या अनुष्ठानात अनिरुद्ध मुळे महाराज, श्याम भागवत गुरुजी, पातळयंत्री ऋषिकेश जोशी हेही सहभागी झाले.

हे सर्वजण दुर्गा सप्तशती, रामरक्षा आणि महामृत्युंजय मंत्राबरोबरच महामारीशमन मंत्राचाही जप करत आहेत. या विशेष मंत्राचा जप केल्याने कोरोनाच्या महामारीचे शमन होईल, अशी श्रद्धा असल्यानेच हे अनुष्ठान केल्याचे खैरे यांनी कळवले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हा मंत्र नेमका आहे कोणता?

ओम उपसर्गानशेषांस्तु महामारीसमुदभवान्!
तथा त्रिविधमूल्पात महात्म्यं शमयेन्मम!!

या मंत्राचा ४४ हजार वेळा जप आणि होमहवन करण्यात आले. मार्तंडपुराणात दुर्गा सप्तशती विधीत सांगितल्याप्रमाणे वैश्विक महामारीत जो कुणी दुर्गा सप्तशतीचे वाचन करेल, त्यांचे पाठीशी भगवती सदैव राहील. 

शिवसेनेच्या वतीने सर्वच स्तरांवर कोरोनाच्या विरोधात मोठे प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः लॉकडाऊनमुळे अनेक गरजू, निराधार यांना अन्नदानाचा यज्ञ करत आहे. डॉक्टर, आरोग्ययंत्रणा यांना सहकार्य करीत आहे. आमचे मार्गदर्शक, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे. तरी या सर्वांचे प्रयत्न व मेहनतीला यश यावे, याकरिता हे जपानुष्ठान करण्यात आले आहे
- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते

सर्वांनी हा जप करा

सर्वांनी आपल्या वेळेनुसार 'ओम उपसर्गानशेषांस्तु महामारीसमुदभवान्! तथा त्रिविधमूल्पात महात्म्यं शमयेन्मम!!' या मंत्राचा जप अवश्य करावा. आरोग्य संघटना व शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे. सर्वांनी घरी बसून सहकार्य करावे, असेही आवाहन चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahamari Shaman Mantra Ramraksha Jap For Coronavirus Chandrakant Khaire News