काळोखात बुडालेले शहर पुन्हा उजेडात

अनिल जमधडे
गुरुवार, 26 मार्च 2020

 महावितरणने केला वीजपुरवठा सुरळीत

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे बुधवारी (२५) सायंकाळी अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. कोरोनाच्या संकटातही कर्तव्य बजावत असलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे आव्हान पेलत भर पावसात पहाटेपर्यंत काम करून शहराचा वीजपुरवठा सुरळीत केला.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी केलेली असताना केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. अशा परिस्थितीतही केवळ जनतेला अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचारी झटत आहेत. कोरोनाचे संकट कमी होते की काय म्हणत बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्यांसह पाऊस आला आणि शहरातील विद्युत यंत्रणा बंद पडली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

फांद्या पडल्याने तारा तुटल्या

उच्चदाब वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने तारा तुटल्या, वीज खांबांवरील इन्सुलेटर फुटले, उपकेंद्रांतील रिले जळण्यासह इतर बिघाड निर्माण झाले. त्यामुळे शहरातील ३३ केव्ही क्षमतेच्या २९ उपकेंद्रांचा व १४७ फिडरचा वीजपुरवठा ठप्प झाला. महावितरणच्या अभियंते व
कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पाऊस व अंधारात केले काम

पाऊस व अंधारात लाईन पेट्रोलिंग करत बिघाड शोधला आणि तो दुरुस्त केला. रात्री ११ वाजेपर्यंत ४० टक्के शहराचा, रात्री १२ वाजेपर्यंत ४० टक्के तर पहाटे ४ वाजेपर्यंत शहराच्या उर्वरित २० टक्के भागाचा वीजपुरवठा सुरू केला. या कामात वीजग्राहकांनी संयम बाळगून खंडित 

वीजपुरवठ्यासाठी कमीत

कमी फोन केल्यामुळे महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना तत्परतेने काम करता आले. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता बिभिषण निर्मळ यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते यांच्यासह ४३६ जनमित्र व ९४ यंत्रचालक तसेच विद्युत कंत्राटदारांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

नियंत्रण कक्षाशीच संपर्क साधा

कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी अखंडित वीजपुरवठ्यासाठी कार्यरत आहेत. अशा वेळी वीजग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे. खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी केवळ नियंत्रण कक्षाशाची संपर्क साधावा, जेणेकरून कर्मचाऱ्यांना तत्परतेने काम करता येईल. औरंगाबाद शहरातील ग्राहकांनी ७०६६०४२४१०/७०६६०४२४१२, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील ग्राहकांनी ७८७५७५६६५२ व जालना मंडलातील ग्राहकांनी ७८७५७६४१४४ याच क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavitran News Aurangabad