विभागीय आयुक्त केंद्रेकरांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न, जाळून घेणाऱ्यास वाचविले

माधव इतबारे
Thursday, 15 October 2020

स्वच्छतागृहाच्या बोगस कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील एकाने थेट विभागीय आयुक्तांसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. १४) घडाला.

औरंगाबाद : स्वच्छतागृहाच्या बोगस कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील एकाने थेट विभागीय आयुक्तांसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. १४) घडाला. यावेळी अधिकारी व सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत संबंधिताला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बुधवारी दुपारी पावनेतीन वाजता रुई (ता. अंबड, जि. जालना) येथील दिलीप राजगुरू हे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी केंद्रेकर यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. अनेक जण भेटीसाठी प्रतीक्षेत असल्याने राजगुरू यांना रीतसर चिठ्ठी घेण्यास सांगण्यात आले. दरम्यान केंद्रेकर यांच्या आदेशानंतर सर्वांना संबंधित उपायुक्तांकडे पाठवण्याचा निरोप देण्यात आला. कर्मचारी हा निरोप देत असताना राजगुरू यांनी सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून आयुक्तांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला.

चोवीस तासात मराठवाड्याच्या चाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी

एका कर्मचाऱ्याने त्यांना दरवाजात पकडले. या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाला. केंद्रेकरांनी हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजगुरू यांना भेटावयास बोलावले, राजगुरू हे दालनात गेल्यानंतर त्यांनी जवळ असलेल्या पिशवीतील रॉकेलची कॅन काढून अंगावर रॉकेल ओतून घेतले, यावेळी दालनामध्ये केंद्रेकर यांच्यासोबत उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी हजर होते. त्यांनी व कर्मचाऱ्यांनी तातडीने राजगुरू यांना पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान सिटीचौक पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी धाव घेत राजगुरू यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. स्वच्छतागृह न बांधता कामांची बिले उचलण्यात आल्याने चौकशी करण्यात यावी, अशी राजगुरू यांची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Attempted To Torch Himself Before Aurangabad Divisional Commissioner