मेहुणीच्या गर्भातलं बाळ विकण्यासाठी फेसबुकवरून केला सौदा

मनोज साखरे
Sunday, 19 April 2020

हे कुटुंब गरीब असल्याने लग्नासाठी पैशांची जमवा-जमव शक्य नव्हती. त्यामुळे मूल जन्माला येण्‍यापूर्वीच त्याला दत्तक घेणाऱ्यांना शोधावं आणि चार ते पाच लाख रुपयांत होणारे मूल विकुन ते पैसे लग्न व इतर गरजांसाठी वापरावेत, असा त्यांचा मनसुबा होता. त्यासाठी तागडे याने सोशल मीडियावर पीपल ॲडॉप्शन ग्रुप शोधला.

औरंगाबाद : सात महिन्याच्या गर्भवती मेहुणीला तिच्या नवऱ्यानं सोडलं. म्हणून तिचं दुसरं लग्न लावायचं, पण गर्भातल्या बाळाचं काय करणार? त्यानेही शक्कल लढविली अन् चक्क बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याची विक्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. हा अजब प्रकार फेसबुकवर व दत्तक घेणाऱ्यांना टाकलेल्या मेसेजवरुन उघडकीस आला. या भाऊजीवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असा गंभीर प्रकार घडत असल्याने पोलिसांनाही धक्‍का बसला. सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी माहिती दिली की, शिवशंकर प्रेमानंद तागडे (वय ३०, रा. मालखेड, पोस्ट लवाळा, तालुका मेहकर, जि. बुलढाणा) हा औरंगाबादेतील रांजणगाव शेणपुंजी येथे राहतो. त्याच्या मेहुणीला पतीने सोडले आहे. तिला दुसरा विवाह करायचा होता. परंतु ती सात महिन्याची गर्भवती असल्याने होणाऱ्या मुलाचे काय हा प्रश्‍न होता.

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

हे कुटुंब गरीब असल्याने लग्नासाठी पैशांची जमवा-जमव शक्य नव्हती. त्यामुळे मूल जन्माला येण्‍यापूर्वीच त्याला दत्तक घेणाऱ्यांना शोधावं आणि चार ते पाच लाख रुपयांत होणारे मूल विकुन ते पैसे लग्न व इतर गरजांसाठी वापरावेत, असा त्यांचा मनसुबा होता. त्यासाठी तागडे याने सोशल मीडियावर पीपल ॲडॉप्शन ग्रुप शोधला.

मूल हवे असणाऱ्या लोकांचे मोबाईल नंबर मिळवणे व त्यांना मेसेज टाकून मूल घेण्याची ऑफर दिली. यासाठी त्याने चार ते पाच लाख रुपयांची मागणी केली. ही बाब महिला व बालकल्याण विभागाला समजल्यानंतर या प्रकरणात महिला बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पळून गेलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी..

दत्तक प्रक्रियेनुसारच मूल दत्तक घ्यायला हवे. सोशल मीडियावरुन मेसेज पोस्ट टाकून, आर्थिक व्यवहार करुन मूल घेणे कायद्याविरुध्द आहे. त्यात कायदेशीर कारवाई होते.
- गीता बागवडे, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, औरंगाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Detained And Charged For Online Crime Aurangabad News