esakal | पळून गेलेल्या मजूराच्या कुटुंबियांना तेलंगणा पोलिसांनी रोखले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

उमरगा : ऐंशी लोकांना परत आणून सोडले. पोलिसांनी मारहाण केल्याची व्यथा काही जणांनी मांडली. 

पळून गेलेल्या मजूराच्या कुटुंबियांना तेलंगणा पोलिसांनी रोखले

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे प्रवासात अडकलेल्या तेलंगणाच्या ४६५ मजूराच्या कुटुंबांना उमरगा प्रशासनाने अठरा दिवस आश्रय दिला. परंतू प्रशासनाची विनंती झुगारुन दोन दिवसांपूर्वी रात्रीतून निघून गेलेल्या मजूराच्या कुटुंबांना गावापर्यंत पोहचता आले नाही.

तेलंगणातील तांडूरच्या पोलिसांनी त्यांना मंगळवारी (ता.१५) रोखले आणि जेथे होतात तेथेच परत जा... असे सांगत हाकलून दिले. लेकराबाळाकडे तरी बघा ... अशी आर्त हाक देत दया याचना करणाऱ्या महिलांचे म्हणने पोलिसांनी ऐकून घेतले नाही. तुम्ही महाराष्ट्रात परता असे सांगून एका टेम्पोतून तेलंगणाच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत त्यांना आणून सोडले.

मजूर कामासाठी मुंबईल गेलेले तेलंगणाच्या मजूराच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी प्रवेश दिला नव्हता. लॉकडाऊनमुळे ते गेल्या पंधरा ते अठरा दिवसांपासून येथील औद्योगिक वसाहतीत अडकले होते.

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

पहिल्या दिवसापासून त्यांची राहण्याची मानसिकता नव्हती. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले यांनी त्यांची समजूत काढून औद्योगिक वसाहतीत ४६५ जणांची राहण्याची व जेवणाची सोय केली. गेल्या अठरा दिवसांपासून प्रशासनाने तेथे तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी, तर सुरक्षेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना नेमले होते. मात्र लॉकडाऊनचा कार्यकाळ अनिश्चित असल्याने मजूरांच्या कुटुंबांची तेथे राहण्याची मानसिकता दिसत नव्हती.

शनिवारी (ता. ११) रात्रीतून जवळपास दिडशे लोक पायी चालत गेल्याची बाब रविवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. सोमवारी (ता. १३) दुपारी काही लोक निघून गेले होते, तर मंगळवारी (ता. १४) दुपारी उर्वरीत लोक निघून गेले होते. प्रशासनाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलांचा आक्रोश, निघून जाण्याचा हट्ट पाहून प्रशासन हतबल झाले. वास्तविकतः त्यांना रोखण्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने मजूरांना रोखता आले नाही. 

बाबासाहेब करायचे योगा, त्यांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का...

तांडूरच्या सीमेवर पोलिसांनी रोखले ... 
येथून पायी निघून गेलेल्या ऐंशी लोकांना मंगळवारी सकाळी तेलंगणा राज्यातील तांडूर गावाच्या सीमेवर पोलिसांनी रोखले, विनंती करूनही त्यांना सोडून दिले नाही. स्थानिक आमदार एस. राजेंद्र रेड्डी मजूराच्या बाजूने होते. मात्र जिल्हाधिकारी यांनी ऐकले नाही. पोलिसांनी तेथे काही महिला व पुरूषांना मारहाण केल्याचा माहिती मजूर सांगत होते.

एका टेम्पोतून बंदोबस्तात रात्री अकराच्या सुमारास ऐंशी लोकांना औद्योगिक वसाहतीत सोडून पोलिस अधिकारी निघून गेले. भूकेल्या मजूरांना विजय जाधव, बालाजी गायकवाड यांनी जेवणाची सोय केली. दरम्यान उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी मजूरांनी येथेच राहावे, यापुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, प्रशासनाकडुन कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले. प्रभारी पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी प्रशासनाने सहकार्य करीत असताना मजूरांनी लॉकडाऊनच्या काळात पळपुटेपणा करु नये असे आवाहन केले आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल मालूसूरे व कर्मचारी मंगळवारी रात्री बंदोबस्ताला होते बुधवारी सकाळी परत आलेल्या लोकांची नावे घेण्यात आली. 

लॉकडाऊन वाढल्याने आम्हाला गावाकडची ओढ लागली होती. त्यामुळे प्रशासनाचे न ऐकताच आम्ही निघून गेलो. मात्र आमच्याच राज्यातील पोलिसांनी आम्हाला गावाकडे जाऊ दिले नाही. आम्हाला महाराष्ट्राच्या प्रशासनाने जशी राहण्याची, जेवणाची सोय केली तशी तुम्ही येथे करून द्या. पुढे आम्ही जाणार नाही अशी विनंती करूनही तेलंगणा प्रशासनाने ऐकले नाही. काही पुरुष, महिलांना पोलिसांनी मारहाण ही केली. 
- रवि पवार, मजूर