औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू? पिशोरमधील अनेक कोंबड्या अचानक दगावल्या

संतोष शिंदे
Wednesday, 13 January 2021

धक्कादायक बाब म्हणजे कोंबड्या पाळणाऱ्यांना राज्यात बर्ड फ्लूची लागण झालेली असल्याची कोणतीही कल्पना नव्हती.

पिशोर (जि.औरंगाबाद) : पिशोर (ता.कन्नड) येथील शहानगर भागात ३० कोंबड्या बुधवारी (ता.१३) सकाळपर्यंत दगावल्या. परंतु याविषयी आरोग्य विभागाला कोणतीही खबर नव्हती. या विषयी अधिक माहिती अशी की, येथील शहानगर भागात बहुसंख्य घरात कोंबड्या पाळल्या जातात. यातील दोन शेजारी घरापैकी एका घरातील जवळपास २० कोंबड्या आणि दुसऱ्या घरातील दहा कोंबड्या अशा एकूण ३० कोंबडया गळ्याजवळ सूज येऊन व श्वास गुदमरल्याने अचानक दगावल्या.

यामुळे परिसरात बर्ड फ्लूचा संसर्ग झाला की काय या संशयाने घबराट पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोंबड्या पाळणाऱ्यांना राज्यात बर्ड फ्लूची लागण झालेली असल्याची कोणतीही कल्पना नव्हती. अद्याप अनेक कोंबड्या ग्लानी आलेल्या अवस्थेत आहेत. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चोले यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराविषयी त्यांना माहिती देण्यात आली. बुधवारी (ता.१३) सकाळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा
या परिसरात एकत्रित मृत पावलेल्या कोंबड्याची तपासणी केली आहे. हा बर्ड फ्लूचा प्रकार नाही.घाबरण्याचे कारण नाही. या कोंबड्यामध्ये मानमुडी नावाच्या रोगाने या कोंबड्या मृत होत आहेत. औषधोपचार करण्यात आला आहे.परिसरात असा काही प्रकार आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे पिशोर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चोले यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Hens Died In Pishor Aurangabad Latest News