ऐतिहासिक मोर्चे काढूनही समाजबांधव अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेतच

प्रकाश बनकर
Sunday, 9 August 2020

मराठा क्रांती मोर्चासाठी मानसिंग पवार, अभिजित देशमुख, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, रवींद्र काळे, विजय जाधव, सुनील कोटकर, विजय काकडे, रमेश गायकवाड, शिवानंद भानुसे, रमेश केरे, राजेंद्र जंजाळ, अंबादास दानवे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, व्यापारी, उद्योजक क्षेत्रात काम करणारे एकवटले होते. अजूनही संघर्ष सुरूच आहे. 

औरंगाबाद : तीन वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकवटला. मात्र, ज्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले, समाजबांधवांनी बलिदान दिले, ते प्रश्‍न आजही कायम आहेत. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात आलेली नाही. तसेच बलिदान दिलेल्यांना नोकरी, शासनाची मदत मिळालेली नाही. कोपर्डीतील ताईला कधी न्याय मिळणार? त्यामुळे रविवारी (ता.नऊ) हा दिवस समाज प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे समाजबांधवांनी सांगितले.

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

मराठा क्रांती मोर्चासाठी मानसिंग पवार, अभिजित देशमुख, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, रवींद्र काळे, विजय जाधव, सुनील कोटकर, विजय काकडे, रमेश गायकवाड, शिवानंद भानुसे, रमेश केरे, राजेंद्र जंजाळ, अंबादास दानवे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, व्यापारी, उद्योजक क्षेत्रात काम करणारे एकवटले होते. अजूनही संघर्ष सुरूच आहे. 

हेही वाचा- रशियातील मोठ्या उद्योगाला ‘ऑरिक’मध्ये ४३ एकर जागा   

         समन्वयक म्हणतात... 

उपेक्षित समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जागृत झाला. हा दिवस प्रेरणा दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. 
-मनोज गायके पाटील 

गेल्या तीन वर्षांपासून ज्या मागण्यांसाठी मोर्चे काढले होते, हे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला नाही. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या बांधवांना नोकरी आणि आर्थिक मदत नाही, वसतिगृह झाले नाही. 
-अप्पासाहेब कुढेकर पाटील 

कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली नाही; पण समाज एकजूट झाला. बलिदान देणारांना अजूनही न्याय मिळाला नाही, ही खंत आजही आहे. 
-सुरेश वाकडे पाटील 

नऊ ऑगस्ट २०१६ रोजी सर्व संघटना, राजकीय पक्ष, उद्योजक मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्र आले. सरकारवर दबाव आला, तथापि आज आरक्षण न्यायालयात आहे. प्रत्यक्षात पदरात काहीच पडलेले नाही. 
-चंद्रकांत भराड  

सध्याच्या आरक्षणाचा केवळ पावणेसात टक्के फायदा समाजाला घेता आला. यासह आरक्षण टिकेल की नाही याबाबत समाजाला विश्वास नाही, लोक संभ्रमात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रयत्न करून आरक्षण कायम ठेवावे. तसेच कोपर्डीसारख्या घटना देशात घडत आहेत. अशी वृत्ती ठेचण्यासाठी जो धाक पाहिजे तो आम्ही निर्माण करू शकलो नाही. आम्हाला पुढे खूप काम करावे लागणार आहे. 
-विनोद पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha is still waiting for justice Aurangabad News