यासाठी मराठवाड्यातील 35 आमदार-खासदारांनी दिला पाठींबा

शेखलाल शेख
Wednesday, 5 August 2020

मराठवाडा व इतर विकास मंडळांना लवकरच मुदवाढ मिळावी यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या मोहिमेला मराठवाड्यातील ४६ पैकी ३५ आमदार, खासदारांनी पाठींबा दिला असून तसे पत्र मुख्यमंत्री व राज्यपालांना पाठविले आहे. 

औरंगाबादः मराठवाडा व इतर विकास मंडळांना लवकरच मुदवाढ मिळावी यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या मोहिमेला मराठवाड्यातील ४६ पैकी ३५ आमदार, खासदारांनी पाठींबा दिला असून तसे पत्र मुख्यमंत्री व राज्यपालांना पाठविले आहे.

यात विद्यमान मंत्री अशोकराव चव्हाण, खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. रावसाहेब दानवे, खा. हेमंत पाटील, खा. इम्तीयाज जलील, खा. राजीव सातव, खा. संजय जाधव, संजय बनसोडे यांचा समावेश आहे. प्रताप पाटील चिखलीकर, पवनराजे निंबाळकर, अंबादास दानवे, हेमंत पाटील, संजय जाधव यांनी मुख्यमंत्रांना प्रत्यक्ष भेटून तसेच प्रसार माध्यमातूनही मुदतवाढीची मागणी मांडली. उर्वरित काही लोकप्रतिनिधींचा ते आजारी असल्यामुळे व अन्य कारणामुळे संपर्क होऊ शकला नाही असे मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा- कोरोना करतोय तिजोरी रिकामी वाचा सविस्तर

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मराठवाडा व अन्य विकासमंडळाचा मुदतवाढीचा प्रस्ताव राज्यपालांकडे अद्याप पाठविलेला नाही. कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळी विकास मंडळे निर्माण करावी. व विकास मंडळांवर विद्यमान मंत्रिमंडळाने सुचविलेलीच नावं राज्यपालांनी द्यावीत असा विचार पुढे आणलेला आहे. घटना दुरुस्ती केल्याशिवाय कोकण व उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळे विकास मंडळ अस्तित्वात येऊ शकत नाही व सद्यासाठी नावे ठरविण्याचा अधिकार सपूर्णत: राज्यपालांचाच असतो.

मंडळावर नावे सुचविण्याबाबतीत महाराष्ट्र शासनाने मुदतवाढीचा प्रस्ताव ताबोडतोब पाठवावा व कोरोना महामारीच्या अवघड काळात मराठवाडा व विदर्भाची गळचेपी करू नये असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले आहे. या पत्रकावर पंडितराव देशमुख, आमदार डी. के. देशमुख व संस्थेचे पदाधिकारी डॉ. के. के. पाटील, प्राचार्य डॉ. शरद अदवंत, द. मा. रेड्डी, प्रा. अशोक सिद्धेवाड, प्राचार्य जीवन देसाई, शिवाजी नरहरे यांच्या सह्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Vikas Mandal Aurangabad News