Video -स्मशानभूमीत बांधल्या साताजन्माच्या गाठी! 

मधुकर कांबळे 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मसनजोगी अनिल गायकवाड यांच्या मुलीच्या लग्नासाठी चारशे ते पाचशे वऱ्हाडी जमले होते. या वऱ्हाडी मंडळींच्या जेवणासाठी पुरी, भाजी, पुलाव, बुंदी अशी व्यवस्था करण्यात आली होती.

औरंगाबाद- नवरीला हळद लागत होती, त्याचवेळी तिथे अंत्ययात्रा आली. एकीकडे आनंदोत्सव सुरू, तर दुसरीकडे अंत्ययात्रेतील रडारड. वधुपित्याने लाडक्‍या लेकीला लागत असलेल्या हळदीचा कार्यक्रम अर्धवट सोडला व मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली अन्‌ पुन्हा आपल्या लाडक्‍या लेकीच्या हळदीच्या कार्यक्रमात वधुपिता सहभागी झाला. 

त्या लाडक्‍या लेकीचे शुक्रवारी (ता. 14) सिडको एन-सहा येथील स्मशानभूमीत शुभमंगल झाले. यानंतर ती नांदायला दुसऱ्या स्मशानभूमीत असलेल्या सासरी गेली! हा विवाह होता मसनजोगी कुटुंबातील. विशेष म्हणजे हा विवाह जागतिक प्रेमदिनी पार पडला.

 क्‍लिक करा : "व्हॅलेंटाईन' डेला वाढणारा प्रचंड ट्रेंड...वाचा 

लग्नसोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा. मात्र त्यांचा विवाह सोहळा होता स्मशानभूमीत. गेल्या आठ दिवसांपासून तयारी आणि विविध विधी होत होते. यासाठी स्मशानभूमीत मांडव टाकला होता. पाव्हण्यारावळ्यांची वर्दळ सुरू झाली होती आणि वधुपिता आणि वधूच्या आईची पाहुण्यांची सरबराई करताना धांदल उडाली होती. 

गुरुवारी (ता. 13) हळदीचा कार्यक्रम होता. नवरीला हळद लागत होती. दुपारचे तीन वाजले असतील, तेवढ्यात तिथे एक अंत्ययात्रा आली. एकीकडे लग्नाचा आनंदोत्सव, तर दुसरीकडे अंत्ययात्रेत आलेल्या नातलगांची रडारड सुरू होती. अंत्ययात्रा येताच वधुपित्याने हातातील काम बाजूला ठेवले आणि तिथे आलेल्या मृतदेहाच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर वधुपिता परत घरी येऊन हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाला. 

अनेकांना स्मशानभूमीत विवाह म्हणजे विचित्रच वाटेल; पण हे खरे आहे. गायकवाड आणि पवार कुटुंब या विवाहाने एका धाग्याने बांधले गेले. हा विवाह सोहळा होता मसनजोगी कुटुंबातील अनिल गायकवाड यांच्या मुलीचा. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्‍यातील आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरील मूळ गाव असले तरी अनिल गायकवाड यांचा जन्म सिडको एन-सहा येथील स्मशानभूमीतच झाला आहे.

वाचून तर बघा : गोष्टीतला करकोचा आला सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात... 

 त्यांची मुलगी पूनम आणि ब्रिजवाडी स्मशानभूमीत काम करणारे मसनजोगी रामचंद्र पवार यांचा मुलगा अंकुश या दोघांच्या शुक्रवारी (ता. 14) सिडको एन-सहा येथील बौद्ध स्मशानभूमीत साताजन्माच्या गाठी बांधल्या गेल्या. 

आमचा जन्म इथेच, मरणंही इथंच

वधुपिता अनिल गायकवाड म्हणाले, माझी मुलगी पूनमचे येथील धर्मवीर संभाजी शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिचा ब्रिजवाडीच्या स्मशानभूमीत रामचंद्र पवार यांचा मुलगा अंकुशसोबत विवाह झाला आहे. जावयाचे 12 वीपर्यंत शिक्षण झाले आहे. 

आमचा जन्म इथेच. आमचं जगणं आणि मरणंही इथंच. आमचे सर्व पाहुणे स्नशानभूमीत राहतात. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना इथे एक अंत्ययात्रा आली होती. त्यावेळी आधी कर्तव्य पार पाडले आणि नंतर हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झालो. आम्ही सर्वांचे मृतदेह इथंच जाळतो आणि आमची सुख-दुःखेही वाटून घेतो. 

ठळक बातमी : राज ठाकरेंनी अर्ध्यातच गुंडाळला औरंगाबाद दौरा, उद्याच जाणार माघारी 

जेवणाची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली 

मसनजोगी अनिल गायकवाड यांच्या मुलीच्या लग्नासाठी चारशे ते पाचशे वऱ्हाडी जमले होते. या वऱ्हाडी मंडळींच्या जेवणासाठी पुरी, भाजी, पुलाव, बुंदी अशी व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत येथील शिवसेनेचे नगरसेवक मकरंद कुलकर्णी, शिवसेनेचे विभागप्रमुख सोपान बांगर, शाखाप्रमुख बद्रिनाथ ठोंबरे, पंकज पाषाण, युवा सेनेचे उपजिल्हा युवाधिकारी गणेश तेलोरे, वीरभद्र गादगे, हुशारसिंग चव्हाण, रघुनाथ शिंदे, मधुकर वाघमारे यांनी पुढाकार घेऊन भोजनाची जबाबदारी घेतली होती. 

हेही वाचा : हिंगणघाट,सिल्लोडनंतर आता ठेवावीच लागेल... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage In Funeral House Aurangabad News