मशाल मोर्चा भाजप पुरस्कृत, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आरोप

प्रकाश बनकर
Wednesday, 4 November 2020

औरंगाबादेत २४ ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी निर्णायक बैठक झाली. यात राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील समन्वयक सहभागी झाले होते. त्या बैठकीत मशाल मोर्चा काढण्याविषयी कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

औरंगाबाद : औरंगाबादेत २४ ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी निर्णायक बैठक झाली. यात राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील समन्वयक सहभागी झाले होते. त्या बैठकीत मशाल मोर्चा काढण्याविषयी कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असताना राज्यातील कोणताही समन्वयक सोबत नसताना रमेश केरे यांनी मशाल मोर्चाची घोषणा केली. हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे पाटील यांनी केला आहे. याच्याशी आमचा कुठलाच संबंध नसल्याचेही रवींद्र काळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, मराठा महासंघाचा इशारा

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की जिल्‍ह्यातील कुठलेही समन्वयक सोबत नसतानाही रमेश केरे निर्णय कसा घेऊ शकतात.यांचा बोलविता धनी कोण? हे त्यांनी स्पष्टपणे सांगावं हे आमचे आव्हान आहे. राज्यव्यापी निर्णायक बैठकीत निर्णय न घेता अचानक कुठलाही निर्णय घोषित करता. समाजाची दिशाभूल करु नका. अन्यथा तुमचाही समाचार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी दिला आहे.

बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषद; विनायक मेटे, सर्जेराव निमसेंची उपस्थिती

पत्रकार परिषद
मराठा आरक्षणप्रश्‍नी सात नोव्हेंबरला मुंबईत ‘मातोश्री’वर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील समन्वयक यांचे नेतृत्व करतील, अशी माहिती मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी बुधवारी (ता.चार) पत्रकार परिषदेत दिली. श्री. केरे म्हणाले की, मराठा आरक्षण लांबवू पाहणारे महाविकास आघाडीचे ओबीसी मंत्री आता मराठा-ओबीसी वाद पेटवत आहेत. मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक व नोकरभरतीसंदर्भात राज्य सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही व आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती मागे घेतली जात नाही, तोपर्यंत लढा देण्यात येणार आहे. आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी सात नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mashal Morcha BJP Sponsored, Maratha Kranti Morcha Coordinator's Allegation