झेडपीच्या शाळेत फुलपाखरांसह पक्ष्यांना हक्काचा निवारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

फुलंब्री (जि. औरंगाबाद) - गणोरी (ता. फुलंब्री) जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या मदतीने हरितशाळा अभियानांतर्गत आता फुलपाखरे आणि पक्ष्यांनाही हक्काचे घर मिळणार आहे. प्रशालेच्या मैदानावर 52 स्थानिक देशी प्रजातींची सातशे झाडे अवघ्या दोन हजार चौरस फुटात विकसित करून जैवविविधता जपली जाणार आहे. 

फुलंब्री (जि. औरंगाबाद) - गणोरी (ता. फुलंब्री) जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या मदतीने हरितशाळा अभियानांतर्गत आता फुलपाखरे आणि पक्ष्यांनाही हक्काचे घर मिळणार आहे. प्रशालेच्या मैदानावर 52 स्थानिक देशी प्रजातींची सातशे झाडे अवघ्या दोन हजार चौरस फुटात विकसित करून जैवविविधता जपली जाणार आहे. 

गणोरी या डोंगर कुशीत लपलेल्या गावातील हिरवाई आता नाहीशी होत आहे. शेतजमिनीच्या वहितीसाठी जंगलतोड झाली. मात्र, आता नव्या झाडांसाठी जमीन ही समस्या केवळ नागरी भागापुरती मर्यादित राहिलेली नाही. यावर उपाय सुचविणाऱ्या या उपक्रमात जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी संशोधित केलेल्या तंत्रानुसार ही झाडे मर्यादित जागेत वाढविली जाणार आहेत. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचा प्रारंभ गुरुवारी (ता. दोन) शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्या हस्ते गणोरीत झाला. या समारंभाला गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील, विस्तार अधिकारी राजेश महाजन, सरपंच पद्‌माताई जाधव, उपसरपंच बाळासाहेब तांदळे, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव, उपाध्यक्ष हरिदास गायकवाड, ग्रामविकास अधिकारी सुरेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. ही माहिती मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी दिली. 

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

असा आहे प्रकल्प 

गणोरी परिसरातील वन आच्छादन वाढविण्यासाठी नैसर्गिकरीत्या हे घनदाट वन जोपासले आहे. अतिजलद गतीने झाडे वाढविणाऱ्या या तंत्रात पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने वृक्ष, उपवृक्ष, झुडपे यांचे संतुलन ठेवले जाते.

चार फुटांपर्यंत खड्डा घेऊन त्यात काळी माती, राईस हस, कोकोपीट, बाजरीचा भुसा, शेणखत, अमृतजल यांचे स्तर तयार करण्यात आले आहेत. या झाडांमुळे विद्यार्थ्यांना स्थानिक प्रजातीची माहिती मिळेल. या झाडांमुळे जमिनीची धूप थांबते.

परिसराचे तापमान दोन ते पाच टक्के कमी राहते. तीस टक्के ऑक्‍सिजन अधिक मिळतो. पंचवीस ते तीस टक्के कार्बन डायऑक्‍साईड जास्त शोषला जातो. जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढते. हवा स्वच्छ राहते. ध्वनिप्रदूषणही कमी होते. झाडांच्या मूळसंस्था एकमेकांशी स्पर्धा करीत सशक्त होऊन निकोपरीत्या वाढतात.

अवघ्या सहा महिन्यांनंतर जैवविविधता वाढून फुलपाखरे आणि पक्ष्यांना हक्काचे घर निवारा मिळणार आहे. वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासासाठी मुलांना हा उपक्रम उपयुक्त आहे.

लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षराजीत बेल, शिरस, कडुलिंब, मोहवा, कदंब, कळंब, बहावा, शिसम, पिंपळ, आंबा, बेहडा, अर्जुन, डिढा, बिबा, जांभूळ, हिरडा, खैर, आपटा, पळस, कांचन, तुळस, सीताफळ, पुत्रंजीवी, उंबर आदी वृक्षराजींचा समावेश असल्याचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी सांगितले. 
 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miawaki Style Dense Forest Project Started in Ganori School Phulambri Aurangabad Environment News