औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके

माधव इतबारे
Friday, 3 January 2020

शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. महापालिकेने कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना पकडून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र, अद्याप कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही. मोकाट कुत्रे लहान मुले, वृद्धांवर हल्ले करत आहेत. 

औरंगाबाद- शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असून, गुरुवारी (ता. दोन) दुपारी निजामगंज कॉलनीतील रणछोडदास मैदान परिसरात आठ ते दहा कुत्र्यांनी मुलांसह महिला-पुरुष अशा आठ जणांचे लचके तोडल्याने खळबळ उडाली. नगरसेविका मलेका बेगम कुरेशी यांचे पती हबीब कुरेशी यांनी तत्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, संतप्त जमावाने कुत्र्यांचा पाठलाग करून दोन कुत्र्यांना मारून टाकले. 

शहरात गेल्या काही वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. महापालिकेने कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना पकडून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र, अद्याप कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही. मोकाट कुत्रे लहान मुले, वृद्धांवर हल्ले करत आहेत. गुरुवारी दुपारी निजामगंज कॉलनीत कुत्र्याने तब्बल आठ जणांचे लचके तोडल्याचा प्रकार घडला. जिन्सी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या मैदानावर मुले खेळत होती. यावेळी आठ ते दहा कुत्र्यांनी या मुलांवर हल्ला केला; तसेच एका रिक्षामध्ये आईवडिलांसोबत रिक्षात बसत असलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या गळ्याचाही चावा घेतला. त्यानंतर एका घराजवळ बसलेल्या दोन भावांचेही कुत्र्यांनी लचके तोडले. त्याचबरोबर दोन महिला आणि पुरुषांवरही हल्ले करत लचके तोडले. यावेळी परिसरातील तरुणांनी कुत्र्यांच्या तावडीतून जखमींची सुटका केली. त्यानंतर जमावाने कुत्र्यांचा पाठलाग सुरू केला. दोन कुत्र्यांना जमावाने मारून टाकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी 

याआधीही घडल्या होत्या घटना 
शहरात कचराकोंडी निर्माण झाल्यानंतर कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता. नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्यानंतर तेथील कुत्रे शहरात आले. शहरातील चौकाचौकात या कुत्र्यांच्या झुंडी होत्या. यानंतर महापालिकेने अनेकदा कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली. तरीही कुत्र्यांची दहशत काही कमी झाली नाही. जुन्या शहरात तसेच सातारा-देवळाई परिसरात कुत्र्यांनी लहान मुलांचे लचके तोडण्याच्या घटना घडल्या होत्या. 

क्‍लिक करा : चक्‍क अंत्यविधीचे साहित्य घेउन शेतकरी गेला मंत्रालयात 

कोणी दखल घेईल का? 
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्‍न शहरात ऐरणीवर आलेला आहे. परंतु, महापालिका त्याची म्हणावी तशी दखल घेताना दिसत नाही. आजही काही चौकात कुत्र्यांच्या झुंडी रात्री फिरत असतात. एकटा-दुकटा पायी चालणारा माणूस किंवा दुचाकीस्वार दिसला की हे कुत्रे त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Aurangabad, eight people were bitten by dogs