esakal | शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शिवसेना, एमआयएम आले एकत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शिवसेना, एमआयएम आले एकत्र 

नुकसानाची पाहणी करण्यासाठी महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकत्र आले होते. शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा बैठकीत देखील या दोघांमध्ये चांगला संवाद दिसून आला. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शिवसेना, एमआयएम आले एकत्र 

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले. तर ९७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिके तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. सध्या पिकांच्या नुकसानची पंचनामे करुन आर्थिक मदतीची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शिवसेना आणि एमआयएम एकत्र आल्याचे चित्र मंगळवार (ता.२९) रोजी जिल्ह्यात बघायला मिळाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, वैजापुर तालुक्यातील पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकत्र आले होते. शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा बैठकीत देखील या दोघांमध्ये चांगला संवाद दिसून आला. 

अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पंचनामे करून घेतले होते. त्यांनतर मंगळवार (ता.२९) रोजी त्यांनी कन्नड आणि वैजापुर तालुक्यात आढावा बैठक घेतली. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत पंचनामे करायला लावले. विशेष म्हणजे खासदार इम्तियाज जलील, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे देखील त्यांच्या सोबत होते. तसेच वैजापुर येथील आढावा बैठकीत आमदार रमेश बोरणारे हे बैठकीत उपस्थितीत होते.

दोघा भावांनी तयार केले पाणीपुरीचे एटीएम

देशावर आणि राज्यावर गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना त्यात अतिवृष्टीची भर पडली. हातचे पीकं, फळबागा आणि शेतजमीन डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी राजकारण, मतभेद बाजूला सारून लोकप्रतिनिधी एकत्र आले. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील हे जिल्ह्यातील दोन मोठे नेते आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. 

कृषी विधेयकावर ठोस भुमिका घ्या.. 

आढावा बैठक आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील यांनी सत्तार यांच्या समोरच शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. कृषी सुधारणा विधेयकाला शिवसेने लोकसभेत पाठिंबा दिल्याचे सांगत खिचडी सरकार असले की अशी फजिती होते, असा टोला लगावला. शिवसेनेने कृषी विधेयका संदर्भात आपली भूमिका मोकळेपणाने मांडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.