
शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत एका कार्यक्रमात सांगीतले की, एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली आहेत. मात्र, त्यांचा भाजपमध्ये सन्मान केला जात नाही. त्यानी शिवसेनेत यावे, त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून खडसेंना पक्षात आणण्याचा प्रयत्न करू.
औरंगाबाद : एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली नेते आहेत. ते संपणारे नेते नाहीत. ओबीसी समाजाला सोबत घेऊन अन्यायग्रस्त खडसेंनी शिवसेनेत यावे, त्यांना शिवसेनेत निश्चितच चांगले भवितव्य असेल, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन शनिवारी झाले. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सत्तार एकत्र होते. माझ्याविषयी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप आज खडसे यांनी केला. हाच धागा पकडून सत्तार म्हणाले, खडसे यांच्यामुळेच भाजप-शिवसेनेची तुटलेली युती पुन्हा जुळली होती. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते; मात्र त्यांच्यावर अन्याय झाला. कटप्पाने बाहुबलीला मारले, तसाच काहीसा प्रकार खडसेंबाबत झाला. आता ओबीसी समाजाला सोबत घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावे. शिवसेनेला खडसेंसारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून आम्ही खडसेंना पक्षात आणण्याचा प्रयत्न करू.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
खडसेंची नाराजी दूर करू - दानवे
एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यात भाजप वाढवण्यात त्यांचे योगदान आहे. राजकीयदृष्ट्या काही निर्णय घ्यावे लागतात. त्यात कोणी मागे जाते तर कोणी पुढे जाते. त्यातून एखाद्याला माघार घ्यावी लागली तर ती नाराजी समजू नये. केवळ नाथाभाऊच नाहीत, तर राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे नेले जाते तसे थांबवलेही जाते. खडसेंत नाराजी असेल, तर ती एकत्र बसून दूर केली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
(संपादन-प्रताप अवचार)