esakal | खैरेंनी मिशा काढून, दाढीला मेंदी लावावी - प्रकाश महाजन
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

क्रांती चौकात शुक्रवारी (ता. २१) मनसेतर्फे वारीस पठाणांच्या विरोधात अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रकाश महाजन यांच्यासोबत यावेळी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचीही उपस्थिती होती. गोली मारो सालों को, देश के गद्दारों को, अशा घोषणाही देण्यात आल्या.

खैरेंनी मिशा काढून, दाढीला मेंदी लावावी - प्रकाश महाजन

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : वारीस पठाणांना ताबडतोब अटक केली पाहिजे; पण मला विश्वास आहे की, हे तीन पक्षांचे सरकार त्यांना अटक करणार नाही. इथून पुढे शिवसेनेच्या माजी खासदारांनी श्रावणात दाढी वाढवू नये. त्यांनी आता कायमचीच दाढी वाढवावी. मिशा काढाव्यात आणि दाढीला मेंदी लावावी. आता तेवढेच त्यांच्या हातात राहिले आहे. शिवसेना त्यांच्याशी लढू शकत नाही. हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी खांद्यावर घेतला आहे, असे वक्तव्य मनसेचे प्रकाश महाजन यांनी केले.

क्रांती चौकात शुक्रवारी (ता. २१) मनसेतर्फे वारीस पठाणांच्या विरोधात अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. प्रकाश महाजन यांच्यासोबत यावेळी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचीही उपस्थिती होती. गोली मारो सालों को, देश के गद्दारों को, अशा घोषणाही देण्यात आल्या.

हेही वाचा : योगी ठाकूर यांना ही जाब विचारा  - इम्तियाज जलील

श्री. महाजन म्हणाले, की चार दिवसांपूर्वी गुलबर्गा येथे बोलताना एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी अतिशय घृणास्पद भाषा वापरली. यामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. या सभेला दोन खासदार यात औरंगाबादचे इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी दोघेही हजर होते.

कासीम रजवी रझाकार होता, त्याची एमआयएम ‘नाजायज औलाद’ आहे. हे रझाकारांचे वंशज आहेत. त्यांची ही भाषा आम्ही त्यावेळीही मोडून काढली होती आणि यावेळीही मोडून काढू. पंधरा कोटी नाही, तुम्ही वीस कोटी आणा, अख्खा पाकिस्तान आणून उभा करा. शंभर कोटी जनता उठली आणि ती जरी थुंकली तरी, तुम्ही वाहून जाल. यापुढे अशी भाषा आम्ही खपवून घेणार नाही.

हेही वाचा : एमआयएमच्या खासदारांना इतकं भडकायला काय झालं : पहा Video

यापुढे वारीस पठाणला महाराष्ट्रात भाषणावर बंदी असली पाहिजे. एमआयएमचा हा जातिवाद आम्ही इथे चालू देणार नाही. सीएएच्या नावाखाली एमआयएम त्यांच्याच लोकांना भ्रमित करतो. ते चूक आहे. कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. त्यामुळे एमआयएमची जी खेळी आहे ती यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संघटक वैभव मिटकर, अशोक पवार, राजीव जावळीकर, मंगेश साळवे, योगेश शहाणे, निखिल ताकवले आदींची उपस्थिती होती.